पालघर-योगेश चांदेकर :
पालघर- पालघर जिल्हा परिषदेवर दुसऱ्यांदा सदस्य म्हणून निवडून आलेल्या भारती भरत कामडी यांची जिल्हा पररिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली असून निलेश भगवान सांबरे हे उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्याचे आज जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी जिल्हा परिषद संकुल येथे आज दि.१८/२/२०२०रोजी घोषित केले. आज सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत तीन महिला उमेदवारांनी अध्यक्षपदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते.
मनिषा यशवंत बुधर, भारती भरत कामडी, सुरेखा विठ्ठल थेतले यांनी अध्यक्षपदासाठी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्राला अनुक्रमे मनिषा मनोहर निमकर, वैशाली विजय करबट, ज्योती प्रशांत पाटील यांनी सूचक म्हणून मान्यता दिली. तर विष्णू लक्ष्मण कडव, निलेश भगवान सांबरे, जयवंत दामू डोंगरकर यांनी उपाध्यक्ष पदासाठी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्राला अनुक्रमे नीलिमा सुरेश भावर, हबीब अहमद शेख, महेंद्र चंद्रकांत भोणे यांनी अनुक्रमे सूचक म्हणून मान्यता दिली.

प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी केली असता छाननी अंती सर्व नामनिर्देशन पत्र वैध ठरवण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.शिंदे यांनी सांगितले. छाननी नंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी देण्यात आला. यात अध्यक्षपदाच्या मनीषा बुधर आणि सुरेखा थेतले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर भारती कामडी यांचे अध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्ष पदाचे उमेदवार विष्णू कडव आणि जयवंत डोंगरकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निलेश सांबरे यांचे नाव निश्चित झाले. नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे, उपजिल्हाधिकारी (साप्रवि).किरण महाजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. पालघर, चंद्रकांत वाघमारे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि), संघरत्ना खिल्लारे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.) टी.ओ.चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी( पा व स्व) तुषार माळी, सर्व जि.प.सदस्य, पंचायत समिती सभापती उपस्थित होते.