[पालघर-योगेश चांदेकर]

तारापुर औद्योगिक वसाहतीतील फार्मा कंपनीत झालेल्या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला, तर 7 जण जखमी झाले. औद्योगिक वसाहतीत आतापर्यंत शेकडो लहान मोठे अपघात घडले आहेत तर शेकडो कामगारांचा बळी गेला आहे आणि शेकडो कायमचे अपंग झाले आहेत, हजारो अपघातग्रस्त (प्रभावित) आहेत. या पार्श्वभूमीवर भाष्य करणारा पर्यावरण दक्षता मंच बोईसर-तारापूरचे मनीष संखे यांचा औद्योगिक सुरक्षेवर हा डोळ्यात अंजन घालणारा लेख.
जसा आहे तसा:

३ डिसेंबर १९८४, UNION CARBIDE CORPORATION ह्या भोपाळ येथील पेस्टीसाईड बनविणाऱ्या कारखान्यातून MIC नामक घातक विषारी वायूची गळती झाली. आजवरच्या औद्योगिक अपघातातील पहिली सर्वात मोठी दुर्घटना होती ह्यात जवळपास २२,००० निष्पाप लोकांचा बळी गेला तर १,५०,००० लोक कायमचे अपंग झाले आणि ५ लाख लोक दुर्घटनाग्रस्त (प्रभावित) झाले. ह्या घटनेला ३४ वर्षांचा काळ लोटला परंतु अजूनही दुष्परिणाम जाणवत आहेत तीन दशकापासून, चार पिढ्या पर्यंत अजूनही झळ सोसत आहेत, भूगर्भातील पाण्यात आजही घातक विषारी अवशेष असल्याचे आढळते. एवढी मोठी मनुष्य हानी झाली आजही मनाला धास्तावत आहे.

अपघात कसा झाला होता?
व्यवस्थापकांनी कमीत कमी कामगारांकडून जास्तीत जास्त उत्पादन काढणे, औद्योगिक सुरक्षतेसाठी लागणारा खर्च कमी करणे, maintenance, repaiiring वर होणाऱ्या खर्चात कपात करणे, अकुशल कामगारांकडून प्लान्ट हाताळणे, औद्योगिक सुरक्षा नियमांची पायमल्ली करणे, हे सर्व काही व्यवस्थापकांनी पैसे वाचविण्यासाठी केले.
भोपाळ दुर्घटना विषयी सांगण्यामागचा हेतू असा की, बोईसर MIDC क्षेत्रात काय वेगळं चालू आहे. आतापर्यंत शेकडो लहान मोठे अपघात घडले आहेत तर शेकडो कामगारांचा बळी गेला आहे आणि शेकडो कायमचे अपंग झाले आहेत हजारो अपघातग्रस्त (प्रभावित) आहेत. रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यात आजही ज्वलनशील, घातक रसायने औद्योगिक सुरक्षा नियमानुसार हाताळली जात नाहीत, साठवली जात नाही. सुरक्षा नियमानुसार आपत्कालीन घटनेच्या वेळी सक्षम आपत्कालीन व्यवस्थापन नाही, स्पॉट ऑडिट फक्त नावापुरते तर औद्योगिक सुरक्षा फर्स्ट अधिकारी दिसत देखील नाही.

स्टर्लिंग ऑक्सिलिर्स नामक कारखान्यात आजवर सलग तीन-चार वेळा मोठे अपघात झाले. जवळपास २० कामगारांचा बळी गेला असेल तात्पर्य एकाच कारखान्यात तीन चार वेळा अपघात होऊनही पुन्हा कंपणी चालू कशी होते? हे एका कंपनीचे उदाहरण आहे असे अनेक कारखाने अपघातानंतर जैसे थे स्थितीत आहेत. एका अपघातप्रसंगी कारखान्यात EO नामक घातक रसायनाचा मोठ्या प्रमाणात साठा होता सर्व जळून खाक झालं होतं आग काही फूट अंतरावर होती ह्या घातक रसायनाला आग लागली असती तर त्या ठिकाणापासून २० किलोमीटर परीघात जीवसृष्टी नाहीशी झाली असती एवढी भयानक तीव्रता त्या रासायनामध्ये आहे असे बोलले जात असताना जवळपास ची गावे भीतीने खाली झाली होती. लोक जीव हातात घेऊन पळत होती.आजही जवळपास राहणारे माझ्या सहित सर्वच भीतीच्या वातावरणात राहत आहेत.

भोपाळ दुर्घटनेतील हजारो निस्पाप लोकांचा बळी घेणारा कंपनीचा मालक कुठलीही शिक्षा न भोगता अजूनही अमेरिका सारख्या देशात सुखात आपले जीवन जगत आहे आणि बोईसर येथील ही शेकडो निष्पाप लोकांचे बळी घेणारे कारखानदार ही झालेल्या घटनेचा कारखान्याच्या इन्शुरन्सच्या माधम्यातून दुप्पट रक्कम कमावून शिक्षा विरहित सुखी जीवन जगत आहेत. तर औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय प्रशासनाचे अधिकारी सुस्त मस्त घुस घेण्यात मश्गुल आहेत आणि आपण काहीही होत नाही ह्या मस्तीत बिनधास्त झोपतो आहोत.

आपण कधी जागे होणार? की भोपाळ सारख्या दुर्घटनेच्या पुनरावृत्ती ची वाट बघणार? कधीही उठणार नाही अशी कायमची झोप घेणार?
सतर्कता ही जीवन हैं।। सुरक्षा ही जीवन हैं।।
आपला शुभचिंतक,
मनीष संखे,
पर्यावरण दक्षता मंच बोईसर-तारापूर


मनीष संखे, पर्यावरण दक्षता मंच बोईसर-तारापूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here