पालघर – योगेश चांदेकर :
“लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा” प्रत्येकाला आपले लहानपण पुन्हा एकदा अनुभवायचे असतेच.
काल घडलेला प्रसंग, मोठ्यांनी खरंच लहानांकडून शिकावे असाच काहीसा. काही लहान मुले सेव्ह पपीज् चा गल्ला घेऊन भर उन्हात फिरून पैसे गोळा करीत होती. नक्की प्रकार काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला. तेव्हा समजले की तीन चार दिवसांपूर्वी एका भटक्या कुत्रीने ९ पिल्लांना जन्म दिला होता. दुसऱ्या दिवशी तीच कुत्री मृतावस्थेत आढळली. तीची ती पिल्ले त्या मेलेल्या आईच्या कुशीत भुकेने विव्हळताना लहान मुलांनी पाहिले. लागलीच बच्चे कंपनी पुढे सरसावली. खेळासाठी जमलेली टीम आता त्या पिल्लांपाशी एकवटली. नेमके काय करावे हे कुणालाच कळेना. छोटीशी मुलेच ती…काय करू शकणार होते ? परंतु आपापसात काहीतरी चर्चा झाली आणि कामाला सुरुवात झाली.

प्रथम त्यातील काहींनी दुकानातून पुठ्ठयाचा बाॅक्स आणला. नंतर कुणीतरी घरच्यांच्या नकळत घरातील जुने कपडे आणले. मग पिल्लांना अलगद उचलून बाजूला ठेवले. तोपर्यंत हा प्रकार इतरांच्याही लक्षात आला. मोठ्यांच्या मदतीने मृत कुत्रीला एका निर्जनस्थळी पुरण्यात आले.
आता प्रश्न असा होता की या लहान पिल्लांचे करायचे तरी काय? आणि मग घेतला गेला छोट्या वयाच्या पण मोठ्या मनाच्या मुलांनी घेतलेला एक जिगरबाज निर्णय. सर्व मुलांनी एकत्र येऊन पिल्लांचे पालकत्व स्वीकारायचे ठरवले. पिल्लांना राहण्यासाठी एक छान जागा निवडण्यात आली.
पण डोळेही न उघडलेल्या त्या पिल्लांना कसे हाताळावे हे लहान मुलांना समजेना. तेव्हा सर्व मंडळी गावातील एका प्राणीमित्राच्या घरी पोहोचली. त्या प्राणीमित्राच्या मदतीने मुलांनी पिल्लांची साफ सफाई केली. आता खरा प्रश्न होता त्यांच्या भुकेचा आणि दिनचर्येचा. दुध, औषधे आणि सफाईसाठी टिश्यु पेपर इत्यादींसाठी पैसे तर लागणार मग ते आणायचे कुठून? पठ्ठ्यांनी शक्कल लढवली. सुरूवातीला खाऊचे पैसै एकत्र केले. एक मिलर विकत घेतला त्यावर सेव्ह पपीज् चा कागद लावला आणि स्वारी निघाली कामगिरी पार पाडायला.
एक रूपया पासून ते यथाशक्ती मदत करणारे भेटत गेले. जमलेल्या पैशांतून दुध आणि औषधांची सोय झाली. ती लहान मुले, पिल्लांना मांडीवर घेऊन दुध भरवत होती. खरंच हा क्षण मनाला कुठेतरी सुखावून गेला. त्या पिल्लांचे पालक आता आपणच असल्याची भावना त्या निरागस मुलांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती. माणुसकी अजुनही संपलेली नाही यावरचा विश्वास ठाम राहिला.
आता ती लहान मुले एखाद्या स्वयंसेवी संस्थेच्या शोधात आहेत जी त्या पिल्लांची योग्य काळजी घेऊ शकेल. एखादी स्वंयसेवी संस्था किंवा प्राणी संघटना असल्यास कळविणे.