बोईसर : शाळकरी मित्राच्या सतर्कतेमुळे ‘तो’ बेपत्ता मुलगा सापडला

0
412

पालघर-योगेश चांदेकर

पालघर/बोईसर-१८ फेब्रुवारी २०२०
जीवदानी मंदिर फिरवून आणतो, असे सांगून दोन अज्ञात व्यक्तींनी शुक्रवारी बोईसरच्या कुरगाव येथून कृष्णा पवार या मुलाला पळवून नेले. मात्र दोन दिवसांनंतर त्याचाच शाळकरी मित्र साहिल राऊतला तो विरार स्थानकात दिसल्यानंतर त्याने आणि त्याच्या पालकाने सतर्कता आणि समयसूचकता दाखवली आणि या बेपत्ता मुलाची त्याच्या आई-वडिलांशी भेट घडवून आणली.तारापूरच्या रा. ही. सावे विद्यालयात सहावी इयत्तेत शिकणारा कृष्णा रामचंद्र पवार हा विद्यर्थी १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी कुरगाव येथून बेपत्ता झाला होता. याविषयी पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी शोधपथके तयार केली. हरवलेल्या या मुलाची माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आली, तसेच रेल्वे पोलीस व आरपीएफ यांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.दोन दिवसांनंतर म्हणजे रविवारी याच शाळेत शिकणारा साहिल राऊत आपल्या आईसोबत विरार येथून बोईसर येथे परतत असताना त्यांनी हरवलेला कृष्णा विरार स्थानकातील फलाटावर बसलेला दिसला. आपला सहाध्यायी हरवल्याचे माहीत असल्याने लहानग्या साहिलने आपल्या आईला लगेचच सतर्क केले. त्यांनी कृष्णाजवळ जाऊन विचारपूस केली असता काही अंशी गुंगीत असलेल्या कृष्णाने आपण आपल्या आईसोबत असल्याचे सांगितले. या उत्तराने साहिलची आई रुचिता यांचे समाधान न झाल्याने त्यांनी आपल्या पतीला कृष्णा पवारच्या घरी पाठवून खातरजमा करण्यास सांगितले. कुटुंबीयांशी संपर्क केल्यानंतर सत्य समोर आले. रुचिता राऊत यांनी तात्काळ कृष्णाच्या कुटुंबीयांशी व्हिडीओ कॉल करून संपर्क साधला आणि कृष्णाविषयी माहिती दिली. त्यानंतर त्यांनी कृष्णाला सोबत घेऊन त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. कृष्णा घाबरलेल्या अवस्थेत असल्याने तारापूर पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर त्याला घरी पाठवले.

या संदर्भात प्राथमिक चौकशीअंती कृष्णाला दोन अज्ञात व्यक्तींनी जीवदानी मंदिराचे दर्शन करून आणतो, असे सांगून कुरगाव येथून एका वाहनातून बोईसर येथे नेले. शुक्रवारी त्याला बोरिवली येथे ठेवल्यानंतर शनिवारी त्याला जीवदानी येथे नेले, अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे. त्यानंतर त्या अज्ञात व्यक्तींनी कृष्णा पवारचा ताबा दोन महिलांना दिला. रविवारी कृष्णाला चॉकलेटमधून गुंगीचे औषध देऊन विरार स्थानकातील फलाटावर बसवण्यात आले, असे कृष्णाने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.या संदर्भात तारापूर पोलिसांशी संपर्क साधला असता कृष्णा पवार याच्या शोधासाठी विशेष पथके तयार करण्यात आली होती, असे सांगण्यात आले. तसेच शुक्रवारी अपहरण केल्यानंतर प्रवास केलेल्या संभाव्यमार्गावर असलेल्या सर्व सीसीटीव्हीचे फुटेज पाहून अपहरणकर्त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे तसेच कृष्णा थोडा स्थिरस्थावर झाल्यानंतर अधिक खोलात तपास केला जाईल, असे तारापूर पोलिसांनी सांगितले.दरम्यान, तारापूर एज्युकेशन सोसायटी आणि रा. हि. सावे विद्यालयाने साहिल राऊतने दाखविलेल्या समयसूचकतेचा गौरव केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here