पालघर: तो धान्यसाठा वैधच; खातरजमा न करताच केली कारवाई – भावेश देसाई

0
451

पालघर – योगेश चांदेकर:

उपविभागीय प्रांत अधिकारी विकास गजरे यांनी बोईसर भंडारवाडा येथे शनिवारी (४ एप्रिल २०२०) दुपारी ०३:०० वाजता पकडलेल्या हजारो किलो अन्नधान्याचा साठा पूर्णपणे वैध असून संपूर्ण खातरजमा न करताच कारवाई केल्याचा आरोप डहाणू येथील अन्नधान्य व्यापारी नगरसेवक भावेश देसाई यांनी केला आहे. “बोईसरमधील हजारो किलो धान्यसाठा अवैध? तपास यंत्रणांचा लागणार कस..!” या शीर्षकाखाली मुंबई ई न्यूजने बातमी प्रसिद्ध केली होती.

तांदळाच्या विक्री व साठ्याबाबत माहितीसाठी आम्ही तज्ज्ञांचे मत घेतले असता असे पुढे आले कि केंद्र सरकारने २६ सप्टेंबर २०१६ रोजी G. S. R. 929(E) मध्ये गहू, तांदूळ, डाळी यांच्या विक्रीसाठी असणारी लायसन्सची अट रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. या अन्नधान्याची कुणीही, कुठेही, विक्री करू शकतो त्याबरोबरच या धान्याच्या साठ्यावरील बंधन देखील शिथिल केल्याचे असे G. S. R. 929(E) मध्ये स्पष्ट केले होते. १७ मे २०१७ रोजी या निर्णयातून डाळींना वगळण्यात आल्याचे केंद्र सरकारचे उपसचिव सुरेंद्र सिंघ यांनी राज्यांच्या आणि केंद्र शासित प्रदेशांच्या संबंधित विभागाला कळवले होते. त्यामुळे तांदूळ विक्रीसाठी परवान्याची आवश्यकता नाही हे केंद सरकारनेच स्पष्ट केल्याचे समोर आले आहे.

बोईसरमधील स्थानिक व्यापाऱ्यांनी मे. भावेश कुमार अँड कंपनीकडे मार्चमध्ये लॉकडाऊनमध्ये अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी आगाऊ खरेदी मागणी दिली होती. त्याचा पुरवठा करण्यासाठी कर्नाटक रायचूर येथून तांदूळ मागवण्यात आला होता. सदर ट्रक डहाणू येथे आल्यानंतर लॉकडाऊनमुळे उतरून घेण्यास मजुरांची अडचण असल्याने तो थेट मागणी देणाऱ्या दुकानदारांना द्यावा याउद्देशाने बोईसर येथे पाठवण्यात आला होता असे भावेश देसाई यांनी या कारवाईबाबत बोलताना सांगितले.

“संपूर्ण कागदपत्रे असतानाही जर भावेश देसाई यांचा अन्नधान्याचा साठा सील केला असेल तर हि कारवाई चुकीची आहे. प्रशासनाने लवकरात लवकर याची शहानिशा करून तो धान्यसाठा वैध असल्यास यांच्यावरील दाखल फिर्याद मागे घ्यावी. कोरोनाच्या संकटाच्या काळात धान्यसाठा अडकून पडणे चुकीचे आहे.” – आनंद भाई ठाकूर, आमदार विधान परिषद

“उपविभागीय प्रांत अधिकारी विकास गजरे यांना माल खरेदी केल्याची बिले, ट्रान्सपोर्ट चलन तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीने या बिलांची खातरजमा केल्याचे शिक्के असलेले दस्ताऐवज दाखवले होते. असे असताना देखील ज्या ठिकाणी माल उतरविला त्या ठिकाणचे भाडेकरारपत्र मागत त्यांनी अन्नधान्याची साठेबाजी केल्याचा गुन्हा दाखल केल्याने ती खोली सील केली गेली आहे. सदरचा माल हा नाशवंत आहे तो लॉकडाउनच्या काळात खराब होणे परवडणारे नाही. संपूर्ण खातरजमा न करता केलेल्या कारवाईविरोधात प्रसंगी आम्ही न्यायालयात देखील जाऊ.” – भावेश देसाई, नगरसेवक डहाणू

“स्थानिक व्यापाऱ्यांना देण्यासाठी भावेश यांनी पाठवलेला तांदूळ लॉकडाऊनमुळे उतरून घेऊ शकत नसल्याने तो माझ्या घरातील एका खोलीत ठेवला होता. यामुळे माझे A to Z मॅचिंग सेंटर हे नोंदणीकृत दुकान देखील बॉंग्स असल्याचे सांगत सील केले आहे. लॉकडाउनच्या काळात अनेक व्यापारी, वाहतूकदार हे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाच्या मदतीने दिवसरात्र मेहनत घेत आहेत. अशावेळी हि कारवाई होणे दुर्दैवी आहे.” – अशरफ मेमन (A to Z मॅचिंग सेंटर – बोईसर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here