पालघर: गुन्हेगारांच कंबरडे मोडणारा कर्तव्यतत्पर अधिकारी; गौरव सिंग यांच्या कार्याचा आढावा..!

0
469

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर असल्याच्या संशयातून दोन साधू आणि त्यांच्या चालकाची जमावाने हत्या केली होती. काही दिवसांपूर्वी घडलेल्या या मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेचा संपूर्ण देशभरातून निषेध करण्यात आला होता. त्यानंतर गुरुवारी (दि.7 मे) राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अचानक घटनास्थळाला भेट दिली आणि या प्रकरणाचा आढावा घेतला. या दौऱ्यानंतर गुरुवारी संध्याकाळी पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची कारवाई केली असल्याचे सांगितले. यानंतर दोन वेगवेगळ्या चर्चा जोर धरू लागल्या एक म्हणजे त्यांना संपूर्ण प्रकरणात पाठीशी घातलं जात आहे आणि दुसरी अशी कि या प्रकरणाच खापर विनाकारण त्यांच्यावर फोडलं जात आहे.

अर्थात संपूर्ण देशात या हत्याकांड प्रकरणी तीव्र भावना उमटत असताना त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची कारवाई महाराष्ट्र सरकारच्या गृहमंत्रालयाने केली आहे. त्यामुळे तत्कालीन पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांच्यावर झालेल्या कारवाईचे समर्थन अथवा विरोध या दोन्हीही गोष्टी टाळत अगदी संतुलितपणे त्यांनी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून केलेल्या कार्याचा हा आढावा.

उत्तरप्रदेश राज्यातील जौनपूर येथे १८ ऑक्टोबर १९८६ हा त्यांचा जन्मदिवस. वडील पोलीस इन्स्पेक्टर असल्याने लहान वयातच पोलीसदलाबद्दल विशेष आकर्षण होते. मित्रांसोबत क्रिकेट आणि व्यायाम हा त्यांचा आवडता छंद, अडचणीत असलेल्या मित्रांना मदत केल्याचे त्यांचे अनेक किस्से आजही त्यांच्या मित्रपरिवारात चर्चेला असतात. २०१२ साली नागपूर ग्रामीण मध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांची निवड झाली, त्यानंतर बीड पोलीस दल येथे त्यांनी सेवा बजावली होती. ०४ ऑगस्ट २०१८ रोजी पालघर जिल्ह्याचे ४ थे पोलीस अधीक्षक म्हणून गौरव सिंह यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती, आश्वासक देहबोली आणि वर्दीत असणारा डॅशिंग तितकाच प्रामाणिक अधिकारी हि प्रथमदर्शनी पाहिल्यानंतर पडणारी छाप. हा पदभार मिळण्याअगोदर त्यांच्यावर राज्यपालांच्या सुरक्षेची जबाबदारी होती. कर्तव्यात कोणतीही कसूर न करता सामान्य जनतेला पोलीसांबद्दल, कायद्याबद्दल त्यांना आदर निर्माण व्हावा हि त्यांची कार्यपद्धती. “आम्ही आमची वैयक्तिक प्रामाणिकता उच्च ठेवू, बलाचा भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी एक संघ म्हणून कार्य करू, आमच्या कामात पारदर्शकता आणू, व्यावसायिक कौशल्य वाढविण्यासाठी आणि आपल्या पोलीस दलाच्या कल्याणासाठी कार्य करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू.” हा त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिलेला कानमंत्र.

रेतीचोरी, दारूबंदी, गुटखा, जुगार/मटका, अंमली पदार्थ, वेश्याव्यवसाय, अवैध बांग्लादेशी घुसखोर अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांतर्गत त्यांनी अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या होत्या. सातत्याने कारवाई करत रेतीमाफियांचे कंबरडे मोडले, अंमली पदार्थ तसेच गुटखा पुरवठा करणाऱ्या लोकांवर अनेकवेळा छापे टाकत त्यांना मेटाकुटीस आणले. त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांच्या मनात पोलीस अधीक्षकांचे नाव जरी निघाले तरी धडकी भरली म्हणून समजा. पोलीस दलातील अनेक कर्मचाऱ्यांना कोणताही बडेजाव न करता अतिशय सहजतेने वागवतात अशी त्यांची ख्याती. सामान्य जनतेला एक आश्वासक वाटणारा विश्वासू अधिकारी हि त्यांनी गेल्या २ वर्षात सातत्याने प्रचंड मेहनत घेत निर्माण केलेली स्वतःची प्रतिमा. अगदी गडचिंचले हत्याकांड प्रकरण घडण्याअगोदर महाराष्ट्र राज्य गृहमंत्रालय व सरकारने गौरव सिंग यांनी प्रसंगावधानता दाखवत तब्लिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याबद्दल कौतुक केलं होते. संपूर्ण देशात तब्लिगीमुळे कोरोना पसरतोय हा अर्थ काढण्यात काही लोक मश्गुल असताना पालघर जिल्हा मात्र याबाबत कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमुळे सुरक्षित हातात आल्याचा विश्वास जनतेला यानिमित्ताने मिळाला होता. गडचिंचले प्रकरणात देखील कार्यतत्परता दाखवत एका रात्रीत ११० आरोपींना पकडण्यात त्यांना यश आलं होत.

पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी केलेल्या प्रमुख कारवाया:

रेतीचोरी:
२०१८ – ११६ गुन्हे, ९६ आरोपी कारवाई करत २३,८८,०२,२१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
२०१९ – ११२ गुन्हे, २६३ आरोपी कारवाई करत १४,६१,५५,७५८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

गुटखा:
२०१८ – एकूण ३८ गुन्हे, ७३ आरोपी यांसह ५,९२,११,४६६/- रुपये किमतीचा मुद्देमाल
२०१९ – एकूण १२१ गुन्हे, १८२ आरोपी यांसह १२,८८,३२,४५३/- रुपये किमतीचा मुद्देमाल

दारूबंदी:
२०१८ – एकूण ८९१ गुन्हे, ७३८ आरोपी यांसह २,३४,८८,००९/- रुपये किमतीचा मुद्देमाल
२९१९ – एकूण ६७३ गुन्हे, ६८९ आरोपी यांसह २,४९,७१,०४९/- रुपये किमतीचा मुद्देमाल

जुगार/मटका:
२०१८ – एकूण ७७ गुन्हे, ६२९ आरोपी यांसह २,६१,३७,८७५/- रुपये मुद्देमाल
२०१९ – ७७ गुन्हे, ४३६ आरोपी यांसह ५५,२५,३८२/- रुपये मुद्देमाल

याव्यतिरिक्त अवैध बांग्लादेशीविरुद्ध देखील काही कारवाई करण्यात त्यांना यश आले होते. तसेच अवैधपद्धतीने हत्यार बाळगल्याप्रकरणी तसेच अवैध दारुगोळा व अंमली पदार्थ विक्रीप्रकरणात देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई पालघर पोलिसांनी केली होती.

कोरोनाच्या लॉक डाऊनकाळात लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठी लॉक डाऊनचा कडक अंमल केला होता. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक वाहन चालकांवर कारवाई करत त्यांची वाहने जप्त केली होती. एखाद्या घटनेनंतर अधिकाऱ्यावर कारवाई होते किंवा त्याची बदली होते त्यावेळी सामान्य जनतेच्या भावना तो अधिकारी चांगला वा वाईट एवढ्यापुरत्याच मर्यादित नसतात तर त्याच्या कार्याचा, कामाच्या पद्धतीचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम होत असतो. गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठविल्यानंतर अनेक तरुणांनी व्हाट्सअप स्टेटस आणि फेसबुक पोस्टद्वारे या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. यावरून त्यांच्या कामाच्याबद्दल लोकांमध्ये काय भावना आहे याची झलक पाहायला मिळते. त्यामुळे लोकांमध्ये एक चर्चा अशीही सुरु आहे ती म्हणजे “कालची पुण्याई आज कामाला येत नाही”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here