पालघर-योगेश चांदेकर :

पालघर/उसगाव – आदिवासी कष्टकरी बांधवांच्या प्रलंबित प्रश्नावर श्रमजीवी संघटनेने येत्या 17 तारखेला निघणाऱ्या विराट निर्धार मोर्चा ची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली आहे. मोर्चा निघण्याच्या दोन दिवस आधीच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विवेक पंडित यांच्याशी संपर्क साधून श्रमजीवी संघटनेच्या सर्व मागण्या आणि प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्याची तयारी दाखवत मोर्चा ऐवजी बैठकिसाठी यावे अशी विनंती संघटनेला केली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ही चर्चा व्हावी म्हणून पुढाकार घेतला. मुख्यमंत्र्यांच्या या सकारात्मक भूमिकेचे स्वागत करत संघटनेने चर्चेसाठी तयार असल्याचे सांगत मोर्चा एक आठवडा पुढे ढकलला आहे. मात्र 25 फेब्रुवारी रोजी ठरलेला मोर्चा निघेल हे नक्की आहे असे संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांनी सांगितले.

2022 मध्ये भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देखील गरीब आदिवासी कष्टकरी बांधव पारतंत्र्याच्या मरण यातना भोगत आहेत. याबाबत संघटनेने 26 जानेवारी रोजी निर्णायक लढा पुकारून दुसऱ्या स्वातंत्र्याच्या लढाईची घोषणा केलेली. प्रलंबित प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असे सांगत 17 फेब्रुवारी रोजी ठाण्यात “निर्धार मोर्चा” आयोजित करून हाच मोर्चा नंतर थेट मुख्यमंत्री निवसाकडे वळणार अशी चिन्हे होती. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवेदनशीलता दाखवत गंभीर दखल घेतली. आज मुख्यमंत्र्यांनी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्याशी संपर्क साधत याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात तयार असल्याचे सांगितले. आदिवासी गरिबांच्या प्रश्नावर केवळ चर्चाच नाही तर संबंधित विभागांना तातडीने अंमलबजावणीसाठी निधीही देण्याची सरकारची तयारी असल्याचे सांगितले. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याबाबत पुढाकार घेत ही चर्चा सकारात्मक होईल असा विश्वास दाखवला. बैठकीत चर्चा करू मोर्चा रद्द करावा अशी विनंतीही संघटनेला करण्यात आली. संघटनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागत करत आभार मानले. मात्र नियोजित मोर्चा केवळ पुढे ढकलण्यात येईल,रद्द होणार नाही असे सांगत मोर्चा 17 ऐवजी 25 तारखेला निघणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांनी एका प्रसिद्धीपत्रक वजा संदेशाने जाहीर केले.

गावागावात बैठका, नियोजन शिबीर ,झोन विभाग बैठका घेऊन मोर्चाची जोरदार तयारी सूरु असताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे. संघटनेच्या सर्व मागण्या या गरीब कष्टकरी आदिवासी आणि इतर दुर्बल शेतकरी मागास घटकांच्या न्याय हक्काच्या आहेत. त्याबाबत जर सरकार संवेदनशील आणि कृतिशील असेल तर संघटना सरकारच्या भूमिकेचे स्वागत करेल, मात्र मागण्या मान्य करण्याचा आमचा निर्धार हा मागण्या पूर्ण होईपर्यंत कायम राहील असे यावेळी विवेक पंडित यांनी सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबाबत समाधान व्यक्त केले. निर्धार मोर्च्याच्या तयारीसाठी पुन्हा एक आठवडा मिळाला असे सांगत कार्यकर्त्यांना अधिक उत्साहात प्रचार करण्याचे आवाहन विवेक पंडित आणि रामभाऊ वारणा यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here