महाराष्ट्रासाठी वाईटपणा घ्यायला तयार; मला कोणत्याही प्रकाराचा धोका पत्करायचा नाही – CM उद्धव ठाकरे

0
396

मुंबई : कोरोना विषाणूंचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 3 हजारच्या पुढे गेला आहे. या पार्श्वभूमीवर आज (19 एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला.

“ज्या बालगोपाळांनी आपल्या वाढदिवसाचे किंवा खाऊचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले, त्यांचे कौतुक, तुम्ही काळजी करु नका, सरकार खंबीर आहे, चिमुरड्यांनी आपले पैसे स्वतःजवळच ठेवावे,” असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

“काही निर्णय घेताना माझं कौतुक होतं आहे, तर काही जण मला वाईट बोलतात, पण मी माझ्या महाराष्ट्रासाठी वाईटपणा घ्यायला तयार आहे. कारण मला राज्यावर आलेले संकट संपावयाचं आहे. मुंबई पुण्यात कोरोना रुग्ण वाढणे हे धोकादायक आहे. मला कोणत्याही प्रकाराचा धोका पत्करायचा नाही,” असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

सर्दी, खोकल्याची लक्षण असणाऱ्यांनी फिव्हर क्लिनिकमध्ये जाऊन उपचार घ्यावा:

“नॉन-कोविड रुग्णांच्या म्हणजे किडनी किंवा इतर विकार असलेल्या रुग्णांवर उपचारासाठी दवाखाने खुले ठेवा. सर्दी खोकला ताप अशी कोणतेही लक्षण दिसली तर ती लपवू नका. जर लक्षण दिसतं असतील तर लोकं वाळीत टाकतील का? असा प्रवृत्तीचा महाराष्ट्र नाही,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

तुम्ही घरी उपचार करु नका, फीव्हर क्लिनिकला भेट द्या, कोरोना झाला म्हणजे सगळे संपलं नाही, वेळेत आलेले चिमुकले ते वृद्ध बरे होतात, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

ग्रीन-ऑरेंज झोनमधील उद्योगांना परवानगी

अर्थचक्र रुतलं आहे. कोरोनाच्या संकटातून बाहेर येताना आर्थिक संकट नको. म्हणून ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये येणाऱ्या जिल्ह्यातील काही उद्योगधंद्यांना परवानगी दिली आहे. मात्र जिल्ह्यांतर्गत वाहतुकीला अजूनही परवानगी नाही. काही जिल्ह्यातच मालाची ये-जा करण्यास माफक परवानगी दिली जाईल. तुम्ही जिल्ह्यातील जिल्ह्यात ये-जा करु शकता. पण एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात येऊ शकत नाही,” असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्यात कोरोनाची स्थिती काय?

राज्यात कालच्या दिवसात ‘कोरोना’चे 11 बळी गेले, तर एका दिवसातल्या सर्वाधिक म्हणजे 328 नव्या ‘कोरोना’ रुग्णांची भर पडली. महाराष्ट्रात आता 3 हजार 648 कोरोनाग्रस्त असून राज्यातल्या ‘कोरोना’बळींची संख्या 211 वर गेली आहे. राज्यात काल 34 रुग्ण बरे झाले असून एकूण 365 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. राज्यात आतापर्यंत 67 हजार 468 कोरोना टेस्ट झाल्या असून 63 हजार 476 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here