पालघर: इतर जिल्ह्यांतील व परप्रांतीय मजुरांना जिल्हाधिकाऱ्यांनी केलं ‘हे’ आवाहन..!

0
445

पालघर – योगेश चांदेकर:

कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉक डाऊनमुळे पालघर जिल्ह्यात अडकलेल्या राज्यातील इतर जिल्ह्यांतील व परराज्यातील नागरिकांना त्यांच्या मूळ गावी जाता यावे यासाठी जिल्हाप्रशासन सातत्याने नियोजन करत आहे. मात्र पालघर येथून उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यासाठी रेल्वे गाडी सोडली गेली मात्र बिहारसाठी एकही रेल्वेगाडी सोडण्यात आलेली नाही त्यामुळे नाराज झालेला जमाव बोईसर येथे रस्त्यावर मोठ्या संख्येने जमला होता. हि घटना मुंबई ई न्यूजने समोर आणल्यानंतर याबाबत जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी बोईसर एमआयडीसी येथे व जिल्ह्यातील विविध भागात अडकलेल्या कामगार बांधवाना सहकार्याचे आवाहन केलं आहे. जिल्हा प्रशासन वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या लोकांबाबत मिळालेल्या माहितीनुसार संबंधित राज्य सरकारबरोबर समन्वय साधत असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच त्या सर्व मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्याची व्यवस्था केली जाईल असंही ते म्हणाले.

दरम्यान बिहार राज्य प्रशासनाला पालघर जिल्ह्यात अडकलेल्या १३०६ प्रवाशांबाबत कळवले असून लवकरच त्यांच्याकडून पुढील उपाययोजना करण्याबाबत सूचना मिळतील अशी अपेक्षा आहे. ०८ मे रोजी संबंधित राज्य प्रशासनाला जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी हि माहिती दिली असल्याचे सांगितले. तसेच या सर्वच्या सर्व १३०६ प्रवाशांची आरोग्य चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत हे देखील कळवण्यात आले आहे.

त्यामुळे पालघर जिल्ह्यात अडकलेल्या इतर जिल्हा व राज्यातील प्रवाशांनी खासगी वाहने, अथवा चालत जाऊन जीव धोक्यात घालू नये. जिल्हाप्रशासन याबाबत पाठपुरावा करत असून लवकरच सर्वांना आपापल्या राज्यात रवाना करण्यात येईल, त्यामुळे सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे अस आवाहन डॉ. कैलास शिंदे यांनी केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here