Corona Effect: ‘त्या’ प्रवाशांबाबत ‘हा’ खबरदारीचा निर्णय

0
408

मुंबई। योगेश चांदेकर। कोरोनाबाधित देशातून आलेल्या प्रत्येक प्रवाशाला मुंबईबाहेर जाऊ देऊ नका, अशी शिफारस राज्याच्या साथरोग नियंत्रण समितीने राज्य सरकारला केली आहे. मुंबईबाहेरच्या प्रवाशांवर सक्ती न करता त्यांना मुंबईतील रुग्णालयात, ठरलेल्या हॉटेलमध्ये राहण्याचा अथवा घरी जायचे असल्यास फक्त खासगी वाहनाने जाण्याचा पर्याय देण्यात येणार आहे. 

परदेशातून आलेल्या आणि ‘होम क्वारंटाईन’चा शिक्का असलेले सहा प्रवासी आज सौराष्ट्र एक्‍स्प्रेसमध्ये आढळले होते. त्यांना बोरिवली स्थानकावर रेल्वेतून उतरवण्यात आले. या प्रवाशांना रुग्णालयात प्राथमिक तपासणीसाठी पाठविण्यात आले. तसेच बुधवारी गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या होम क्वारंटाईन असलेल्या चार प्रवाशांनाही पालघर स्थानकावर उतरवण्यात आले. “होम क्वारंटाईन” प्रवासी सहजपणे बाहेर फिरत असल्याने कोरोनाची धास्ती वाढली असून ही एक सामाजिक समस्या झाली आहे. सगळीकडे कोरोनाची भीती वाढल्यामुळे भविष्यात “होम क्वारंटाईन”चा शिक्का असलेल्या प्रवाशांसोबत हिंसक घटनाही घडू शकतात. हा धोका लक्षात घेउन मुंबईत उतरणाऱ्या प्रवाशांना मुंबईतच ठेवा, अशी शिफारस साथरोग नियंत्रण समितीने केली आहे.

  • “आखाती देशातून आजपासून मोठ्या प्रमाणात प्रवासी येण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७०१ प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे. त्यातील २१ प्रवासी हे “ब’ श्रेणीतील म्हणजे त्यांच्यात कोरोनाबाधाची लक्षणे नसली तरी इतर आजार आहेत, त्यांना मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात पाठविण्यात आले; तर ६८० प्रवाशांमध्ये कोणतीही लक्षणे न आढळल्याने त्यांना घरी एकांतात राहण्याचा सल्ला दिला आहे” – डॉ. दक्षा शहा, महापालिका उपआरोग्य अधिकारी
  • “शहराबाहेर राहणाऱ्या प्रवाशांना सेव्हन हिल्स रुग्णालयात राहण्याचा किंवा महापालिकेने ठरवून दिलेल्या हॉटेलमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तसेच एखाद्या व्यक्तीला घरी जायचे असल्यास त्याने खासगी वाहनाने घरी जावे”डॉ. पद्मजा केसकर, महापालिका कार्यकारी आरोग्य अधिकारी

साथनियंत्रण कायद्यानुसार, महापालिकेला विशेष अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार महापालिका प्रत्येक प्रवाशावर निर्बंध आणू शकते; मात्र पालिका अद्याप कठोर भूमिका घेताना दिसत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here