पालघर: मोबाईल नेटवर्कपासून नॉट रिचेबल अशीही कोरोना विरुद्धची लढाई..!

0
503

पालघर – योगेश चांदेकर:

संपूर्ण जग ३ जी नेटवर्कवरून अपग्रेड होत ४ जी झालं आहे. देशभरात देखील जवळजवळ सर्वच ठिकाणी ४ जी नेटवर्कच्या माध्यमातून मोबाईल सेवा सुरु आहे. मात्र पालघर जिल्ह्यात अजूनही अनेक ठिकाणी २ जी नेटवर्क मिळणे देखील दुरापास्तच आहे. जिल्ह्यातील काही गावांत अजून बीएसएनएलचे नेटवर्कही उपलब्ध नाही. लॉक डाउनच्या काळात एकीकडे प्रतिदिन १.५ जीबी डेटा कमी पडतोय असं व्यक्त होणारे नेटिझन्स दिसत असतानाच पालघर मधील हे चित्र एकदम विरोधाभासाचं आहे. केंद्र व राज्य सरकार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपर्कासाठी डिजिटल माध्यमांचा खुबीने वापर करत आहे. आरोग्य यंत्रणा नागरिकांना खबरदारीच्या उपाययोजना यांची माहिती पोहोचवण्यासाठी इंटरनेटचा वापर कर आहे.

मोबाईल नेटवर्क मिळत नसणारी तालुकानिहाय गावांची नावे:

डहाणु तालुकासायवन, शेणसरी, चळणी, किन्हवली, सुखटआंबा, मोडगाव, कांदरवाडी, धानिवरी, ओसरवीरा, बापूगाव, धरमपूर, गडचिंचले, दिवशी, दहेला, खानिव
विक्रमगड तालुकातलवाडा, सोलशेत, कुंज, सारशी, मेढी, कर्हे, साखरे, पोचाडा, बांधण, वेहेलपाडा, डोल्हारी व दादडे येथील काही भाग
जव्हार तालुकापिंपळशेत, खरोंडा, कोथीमाळ, ओझर, दसकोड, दाभेरी, काचरी, डाहोळ, रुईघर, ढोपदरी, जांभळे, वावर, वांगणी, दादर कोपरा, आयना,खेडसा, न्याहाळे, केळघर, बाळकापरा
मोखाडा तालुकाभुरीटेक, नशेरा, अडोशी, बोटोशी
वाडा तालूकापरळी, उज्जेनी, कळनभा, गारगाव, पिंजाळ
तलासरी तालूकावेवजी, वसा, करजगाव, अणवीर, कोचाई, बोरमाल

केंद्र सरकारकडून ‘डिजिटल इंडिया’चा जोरदार प्रचार आणि प्रसार करण्यावर मोठ्या प्रमाणात भर आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड, डहाणू तालुक्‍यातील अनेक गावे, आदिवासी पाड्यांना मोबाईल वा इंटरनेटचे नेटवर्क मिळत नसल्याने येथील नागरिक अनेक सुविधांपासून वंचित आहेत. दुर्गम भागांतील ही गावे आणि पाडे फक्त मोबाईल नेटवर्कबाबत नॉट रिचेबल नाहीत तर विकासाच्या प्रवाहापासून कोसोदूर आहेत. या ‘संपर्क क्षेत्राबाहेर’ असणाऱ्या भागातील लोकांना आजही महत्त्वाचा निरोप पोहचवण्यासाठी नेटवर्क असणाऱ्या शेजारील गावात जावे लागते. गावांमध्ये एखादी व्यक्ती आजारी पडल्यास १०८ रुग्णवाहिकेला संपर्क करण्यासाठी १० ते १५ किलोमीटर अंतर दूर जावे लागते.

नेटवर्क नसल्याने या भागांत सरकारची कामे करणाऱ्या यंत्रणांना मोठ्या कसरतीने कामे करावी लागत आहेत. यामध्ये आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस, आरोग्य विभागाचे हिवताप निवारण कर्मचारी, जिल्हा परिषद शिक्षक, आश्रमशाळा शिक्षक, अन्य सरकारी क्षेत्रांत कामे करणाऱ्या सरकारच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ माहिती देणे, पुरवणे कठीण झाले आहे. यामुळे मोबाईल नेटवर्कपासून वंचित असणाऱ्या यागावांबाबत शासनाने विचार करून या गावांना लवकरात लवकर नेटवर्क सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here