पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्ह्यातील बोईसर, तारापूर एमआयडीसी मध्ये काम करणारे मूळचे बिहारमधील हजारोंच्या संख्येने कामगार आहेत. पालघर येथून उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यासाठी एक ट्रेन सोडली गेली मात्र बिहारसाठी एकही रेल्वेगाडी सोडण्यात आलेली नाही त्यामुळे उद्विग्न झालेला जमाव बोईसर येथे रस्त्यावर मोठ्या संख्येने जमला आहे अशी माहिती मिळते आहे.

पालघर येथून उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यासाठी एक ट्रेन सोडली गेली, या रेल्वेद्वारे १४०० लोकांना रवाना करण्यात आले आहे. मात्र प्रचंड संखेने लोक हे रस्त्यावर उतरलेले आहेत. त्यामुळे बिहारसाठी अद्याप रेल्वेगाडी का सोडली नाही म्हणून संतापलेला हजारोंचा जमाव तारापुर विद्यामंदीर बोइसर येथेच उभा आहे. विशेष रेल्वे सोडण्यात येणार असल्याने पालघर रेल्वे स्थानकाकडे मोठ्या संख्येने परप्रांतीय मजूर जमा होत होते, परंतु १४०० लोकांना प्रवेश दिल्यानंतर रेल्वे थोड्या वेळातच वेगवान झाली आणि अर्ध्याहुन जास्त लोकांना परत परत जावे लागले. इतक्या कमी वेळात ते सर्व कोठून आले? त्यांना रेल्वे असल्याची माहिती कोणी दिली? रेल्वे प्रशासनाने या सर्वांच्या संख्येचा विचार केला होता का? अशा अनेक शंका उपस्थित होत आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने सोशल डिस्टेंसिंगच्या नियमाला हरताळ फासला गेला. या गर्दीमध्ये एक जरी कोरोना बाधित व्यक्ती असेल तर मोठा अनर्थ घडू शकतो. अशाप्रकारे रेल्वे सुरु करण्यात येत असेल तर योग्य ती खबरदारी घ्यायला हवी हे नक्की. तसेच रस्त्यांवर जमलेल्या या परप्रांतीय प्रवाशांबाबत रेल्वे प्रशासन काय निर्णय घेते हे देखील पहावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here