डहाणू प्रतिनिधी – जितेंद्र पाटील:
डहाणू तालुक्यात बापट्स नर्सिंग होम फॉर चिल्ड्रन या खाजगी रुग्णालयाने आकारलेले अवाजवी बिल हा सध्या डहाणुसह संपूर्ण पालघर जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. राजू विंदन या डहाणूत जेमतेम १० हजार रुपये महिना पगाराची नौकरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा इसम. बापट्स नर्सिंग होम फॉर चिल्ड्रन या हॉस्पिटलने राजु यांच्याकडून चक्क एक लाख ६६ हजार रुपये पत्नीचे डिलिव्हरीचे बिल म्हणून आकारले. यामुळे सर्वच नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून प्रशासनाने या घटनेची चौकशी करत हॉस्पिटलचा परवाना तात्काळ रद्द करावा अशी मागणी होत आहे.
दरम्यान याबाबत खुलासा करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडे संपर्क साधला असता त्यांनी सदर बिलाचे समर्थन केले व बिल कमी केल्याचे सांगितले. तसेच सुरुवातीला एकूण एक लाख 66 रुपये इतके बिल आकारण्यात आले होते, नातेवाईकांनी अडचण सांगत विनंती केल्यानंतर त्यापैकी सहा हजार रुपये कमी केले आसल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे हॉस्पिटल प्रशासनाने खरोखरच योग्य बिल आकारले आहे का याची चौकशी करण्याची मागणी रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली आहे. हॉस्पिटलने बिल किती आकारावे यावर सरकारी यंत्रणेचे नियंत्रण नाही का? खाजगी रुग्णालयांची बिलासाठी मनमानी किती दिवस चालणार? असा प्रश्न डहाणूतील सर्वसामान्यांच्या मनामध्ये उपस्थित झाला आहे.
जास्तीचं बिल आकारण्याचा आरोप झालेल्या नर्सिंग होमच्या बिलांचं ऑडिट केल्यास व कसून चौकशी केल्यास सत्य बाहेर येईल. जर त्या हॉस्पिटलने खरंच जास्त बिल आकारले असेल तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी यामुळे ‘पुढच्याच ठेस मागचा शहाणा’ याप्रमाणे इतर हॉस्पिटल गोर-गरिबांची लूट करणार नाहीत. एकूणच मनमानी बिल आकारणारांना चाप बसणे गरजेचं असल्याचा मतप्रवाह लोकांमध्ये अधिक आहे. त्यामुळे अवाजवी बिल आकारणाऱ्या ‘त्या’ नर्सिंग होमची चौकशी होणार का? की कागदी घोडे नाचवून विषय थंडावणार याकडे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.
“आम्ही गरीब सामान्य कुटुंबातील असून माझ्या बायकोच्या प्रस्तुती उपचाराचे बिल तब्बल एक लाख ६६ हजार रुपये आले होते. त्यातील १,६०,०००/- रुपये एवढे बिल आम्ही लोकांकडून उधारीने व उसने पैसे मागून भरले आहे. एवढे बिल आमच्या सारख्या कोणत्या गरीब रुग्णांचे आकारु नये यासाठी प्रशासनाने चौकशी करून न्याय द्यावा”
– राजू विंदन, रुग्ण नातेवाईक
“रुग्णालयाकडून योग्य तितकेच बिल आकारले आहे, इतकंच नाही तर आम्ही त्यांना बिलातून सूट देखील दिली आहे. त्यांची दोन मुलं सिरीयस होती, NIC युनिट मध्ये उपचार घेत होते. साधारणपणे एका मुलाचा खर्च एक लाख होणार असल्याचे सांगितले होते. परंतु त्यापेक्षाही एकदम कमी बिल आकारले आहे. एका मुलाचे बिल 95,000 व दुसऱ्या मुलाचे बिल 60,000 संबंधित रुग्णास आम्ही चांगल्या प्रकारे इतर ही काही एडिशनल वस्तु मोफत दिले आहेत.”
– डॉ. मिलिंद बापट, बापट्स नर्सिंग होम फॉर चिल्ड्रन डहाणू
“एखादे हॉस्पिटलमध्ये जर शासनाने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा जास्त बिल आकारले जात असेल तसेच एखाद्या वस्तूच्या बिला व्यतिरिक्त इतर अतरिक्त बिल आकारले असेल त्याबाबत मा. प्रांत अधिकारी कार्यालय येथे लेखी तक्रार करावी. त्या तक्रारीची योग्य चौकशी करून संबंधित खाजगी रुग्णालय जर दोषी आढळल्यास योग्य कारवाई करण्यात येईल.”
– असीमा मित्तल, सहाय्यक जिल्हाधिकारी