पालघर-योगेश चांदेकर :

पालघर- धुलीवंदनाच्या दिवशी अस्वाली धरणात पोहायला उतरलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मयत तरुण डहाणूच्या मसोली येथील रहिवासी होता.

बोर्डी पासून सुमारे १० की.मी. अंतरावर असलेल्या अस्वाली धरणावर डहाणूतील चार तरुण धुलीवंदनाच्या दिवशी फिरायला आले होते. त्यातील शॉन आर्यन वय (२९ वर्ष ) हा तरुण पोहण्यासाठी धरणात उतरला असता, त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यु झाला. ही घटना मंगळवारी ५ वाजेच्या सुमारास घडली. त्यानंतर संध्याकाळी उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती. मात्र अंधार झाल्यामुळे ती थांबविण्यात आली. बुधवारी सकाळी सुरू झालेली शोध मोहीम दुपारी ३ वाजता मृतदेह सापडल्यावर संपली, यावेळी स्थानिक आदिवासी व डहाणूतील मच्छीमार बांधवांनी शोधमोहिमेत सहभागी होऊन धरणात बुडालेला मृतदेह पाण्याबाहेर काढला, शॉनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी डहाणूच्या आगर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविल्याची माहिती घोलवड पोलिसांनी दिली.

शॉन आर्यन हा उच्चशिक्षित तरुण डहाणूच्या मसोली येथील रहिवासी होता. तर मुंबई येथील एका मल्टिनॅशनल कंपनीत नुकताच उच्चपदावर रुजू झाला होता. असे त्याच्या नातेवाईकांने सांगितले. अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे डहाणू परिसरात शोककळा पसरली आहे. अस्वाली धरणात शोधमोहीम सुरू असताना घोलवड पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश सोनवणे, पोलीस कर्मचारी, डहाणूतील नागरीक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here