कोरोनाच्या संकटाने घेतला ५ घोड्यांचा जीव; मुक्या प्राण्यांच्या खुराकाचा प्रश्न ऐरणीवर!

0
454

पालघर – योगेश चांदेकर:

कोरोना व्हायरसच्या संकटाने फक्त माणसांचाच नाही तर मुक्या प्राण्यांनाही जीव गमावावा लागल्याची हृदयद्रावक घटना घडल्याने शिरगाव व सातपाटी सह संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. पालघरमधील टांगा व्यवसाय मागील अनेक दिवसांपासून लॉक डाऊनमुळे ठप्प असून घोड्यांना योग्य आहार आणि उपचार न मिळाल्याने 5 घोड्यांचा मृत्यू झाला आहे.

पालघर शहरात आजही सामानाची वाहतूक करण्यासाठी घोड्यांच्या टांगा गाडीचा वापर होतो. शिरगाव आणि सातपाटी याठिकाणाचे जवळपास 35 ते 40 टांगामालक शहरात उदरनिर्वाह चालवत होते. मात्र सध्या लॉकडाऊन मुळे हा व्यवसाय ठप्प झाल्याने घोडागाडी हेच उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असलेल्या अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. योग्य खुराक आणि उपचार मिळत नसल्याने या 5 घोड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समजते. अनेक घोडे खुराकाविना कमकुवत झाले आहेत. एकाच जागी बांधून ठेवल्याने अनेक घोड्यांच्या खुरांना जखमा झाल्या आहेत. काही घोड्यांच्या पायांना कमकुवतपणामुळे कोसळल्याने जखमा झाल्या आहेत तर काहींचे पाय मोडले आहेत.

घोडयांना व घरातील लोकांच्या पोटाला पोसणे देखील घोडामालकांना शक्य नसल्याने अनेकांचे जीव टांगणीला लागले आहेत. त्यामुळे माणसांना मिळणाऱ्या रेशनिंग सुविधेप्रमाणे घोडयांना देखील खुराक देण्यात यावा अशी मागणी घोडेमालकांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here