पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कासा ग्रामपंचायत मार्फत ग्रामस्थांना वाटण्यासाठी मागविण्यात आलेल्या 50 रुपये MRP असणाऱ्या हँड सॅनिटायझर बॉटलवर चक्क 190 रुपये MRP चे स्टिकर लावण्यात आले असल्याचा एक्सक्लुजीव व्हिडीओ मुंबई ई न्यूजने प्रसारित केला होता. सदर प्रकरण समोर आल्यानंतर खासदार राजेंद्र गावित यांनी “कंपनीने शासनाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे, अनेक ग्रामपंचायतींनी याअगोदरही सॅनिटायझर वाटप केले आहे. त्यामुळे ठरवून दिलेल्या किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री करण्यात आल्याचे निदर्शनास आणून देत मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन यांच्याकडे संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे”.

याप्रकरणाची माहिती मिळताच जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कामडी, जि. प. बांधकाम सभापती काशिनाथ चौधरी, डहाणू पंचायत समिती उपसभापती पिंटू गहला यांनी देखील जोरदार पाठपुरावा करत जिल्ह्यातील सर्वच संशयित खरेदी व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच सदर कंपन्यांवर गुन्हा दाखल करत त्यांना ब्लॅक लिस्ट करण्याची मागणी केली आहे.

मुंबई ई न्यूजचे विभागीय(पालघर) संपादक योगेश चांदेकर यांनी प्रेसिला कंपनीच्या 100ml हँड सॅनिटायझर बॉटलची कंपनीकडून छापण्यात आलेली किंमत 50 रुपये इतकी आहे असे असताना त्यावर 190 चा स्टिकर लावल्याचा प्रकार उघडकीस आणला होता. याबरोबरच पायलॉन इन्स्टंट हॅन्ड सॅनिटायझरच्या १०० मिली बॉटलची किंमत २२० रुपये असल्याचे देखील त्यांनी उघडकीस आणले होते.

बॉटलवर जास्तीच्या दराचे स्टिकर होते तर ग्रामपंचायतने हि बाब उघड का केली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे खरेदीतील संभाव्य भ्रष्टाचाराचा धोका ओळखून सॅनिटायझर, मास्क यांसारख्या वस्तूंचे दर निश्चित केलेले असताना असे प्रकार होणे धक्कादायक आहे. यामध्ये नफेखोरी करणाऱ्यांविरोधात कडक पावलं उचलली जाणे गरजेचे आहे असा सूर सर्वच स्तरांतून उमटत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here