MUMBAI e NEWS :
जिल्ह्यातील उद्योग वसाहतींमध्ये उद्योजकांना त्रास देण्याच्या घटना वाढत आहेत, त्याबाबत वारंवार तक्रारी येत आहेत. उद्योजकांना त्रास देणाऱ्या कोणाचीही गय करू नये, त्यांच्यावर मोक्का सारख्या कडक कारवाई करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पोलीस विभागाला दिल्या.

विविध विभागांची आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पुणे शहर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमआरडीचे आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे परिसरात असणाऱ्या उद्योग वसाहतीमध्ये परदेशी गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र या उद्योजकांना त्रास देणाऱ्या टोळ्या वाढल्या आहेत. त्यामुळे उद्योजक त्रस्त झाले आहेत. या उद्योजकांना त्रास देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. तसेच उद्योगाजकांनी आपला सीएसआर फंड स्थानिक कामांसाठी देण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रस्तावित पुरंदर विमानतळाच्या कामाला गती देण्याच्या सूचना देताना श्री.पवार म्हणाले, पुण्यातील लोहगाव विमानतळ विस्तारीकरण आणि सोलापूर विमानतळाचे काम युद्ध पातळीवर करावे.

तसेच यावेळी पुणे जिल्ह्यातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी वेगाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.यावेळी प्रतापराव पवार, प्रशांत गिरबने, मुकेश मल्होत्रा, सुरेंद्रकुमार जैन, निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here