पालघर – योगेश चांदेकर:
संपूर्ण देशात संचारबंदी वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात येत आहे. ग्रीन, ऑरेंज, रेड असे झोन जाहीर करून खबरदारीची योग्य ती उपाययोजना केली जात आहे. पालघर जिल्ह्यात १५ पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण असल्याने जिल्हा रेड झोनमध्ये आहे. रेड झोन क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्यापेक्षा अधिकच्या कडक उपाययोजना कराव्या लागणार असल्याचे संकेत राज्यसरकारकडून देण्यात आले आहेत.

राज्यातील सर्वच शाळांना महिनाभरापूर्वी सुट्टी जाहीर करण्यात आली असताना जिल्हापरिषद उपाध्यक्ष निलेश सांबरे यांच्या पत्रकाचा दाखला देत शिक्षण विभाग डहाणू तालुका यांच्याकडून एक अजब गजब परिपत्रक काढण्यात आले आहे. या आदेशाद्वारे जिल्हापरिषद शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांना नियुक्तीच्या गावात राहत असल्याचा पुरावा म्हणून ग्रामसभेचा दाखला केंद्रप्रमुखांकडे जमा करण्यास सांगितला आहे.
संपूर्ण गावेच्या गावे बंद असताना आणि संचारबंदी लागू असताना ग्रामसभा घेण्याबाबत आदेश देणे कलम १४४ चे उल्लंघन नाही का? ग्रामसभा होऊ शकत नसताना अशाप्रकारचा दाखला मागवल्याने संबंधित शिक्षक खोटा दाखला देणार नाहीत का? अशा परिपत्रकाचा परिपाठ करण्यासाठी हि वेळ चुकीची नाही का? असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.