पालघर – योगेश चांदेकर:

२१ वे शतक हे विज्ञानाचे शतक मानले जाते. इंटरनेटच्या अविष्कारानंतर ३जी, ४ जी सेवेच्या माध्यमातून दळणवळणामुळे जवळ आलेलं जग आणखीच जवळ आले आहे. गेल्या काही वर्षात सोशल मीडियाने तर जणू क्रांतीच घडवून आणली, सोशल मीडियावर सक्रिय असणे हे स्टेटस सिम्बलच नाही तर जगाशी कनेक्ट असण्याचा नवा ‘ऑनलाईन’ मार्गच.

कोरोनाच्या संकट काळात नागरिकच नाही तर आरोग्य प्रशासन, पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी, सरकारमधील मंत्री जनजागृतीसाठी, अद्ययावत माहिती पोहचवण्यासाठी व दैनंदिन कामकाजासाठी सोशल मीडियाचा आधार घेत आहेत. पालघर पोलीस देखील याला अपवाद नव्हते. फेसबुक ‘palghar police’ या नावाने चालवण्यात येणाऱ्या पेजद्वारे नागरिकांना योग्य त्या सूचना देण्यात येत होत्या. तसेच पोलीस प्रशासनाकडून जारी करण्यात आलेले आदेश व प्रेस नोटही या पेजद्वारे प्रसिद्ध केले जात असत. मात्र त्या पेजवरून देण्यात येणाऱ्या अपडेट बंद झाल्याने ऑनलाईन असणारे पालघर पोलीस ऑफलाईन का झाले याबद्दल तर्क लावले जात आहेत.

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर आल्याच्या अफवेतून दोन साधू व त्यांचा वाहनचालक यांची जमावाकडून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडातील आरोपींना दुसऱ्याच दिवशी ११० आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती फेसबुक व ट्विटरवर ‘palghar police’ या पेजवरून देण्यात आली होती. त्याच वेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून १०१ आरोपींना अटक करण्यात आल्याचे ट्विट केले होते. सोशल मीडियावरील या दोन्ही वेगवेगळ्या पोस्टचा आधार घेत औसा(उस्मानाबाद) विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी ‘नेमकं १०१ जणांना अटक झालीय की ११० जणांना? ही तफावत गृह मंत्रालय पालघर हत्याकांडाबाबत किती गंभीर आहे याचे द्योतक आहे!’ अशा आशयाची पोस्ट करत त्यावरून रान उठवले होते.

कदाचित यामुळे पालघर पोलीसांचे फेसबुक पेज ऑफलाईन झाले नाही ना? अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. जर हे काही अंशी खरे असल्यास पालघर पोलीसांनी आपले पेज पुन्हा सक्रिय करावे हीच अपेक्षा. संकट काळात माहितीच्या मांडणी पेक्षा माहिती पोहोचणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here