पालघर – योगेश चांदेकर:
राज्यातील सर्वच शाळांना महिनाभरापूर्वी सुट्टी जाहीर करण्यात आली असताना जिल्हापरिषद उपाध्यक्ष निलेश सांबरे यांच्या पत्रकाचा दाखला देत गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती डहाणू यांनी एक अजब गजब परिपत्रक काढल्याची बातमी मुंबई ई न्यूजने प्रसिद्ध केली होती. या आदेशाद्वारे जिल्हापरिषद शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांना नियुक्तीच्या गावात राहत असल्याचा पुरावा म्हणून ग्रामसभेचा दाखला केंद्रप्रमुखांकडे विना विलंब जमा करण्यास सांगितले आहे.

सध्याच्या परिस्थितीत ग्रामसभेचा ठराव असल्याचे पत्र जमा करण्यास सांगणे म्हणजे संचारबंदीचे उल्लंघन करण्यास सांगणेच होय. या पत्रकाबाबत अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहे. जिल्हापरिषद अध्यक्षा भारती कामडी यांनी कोरोनाचे संकट पूर्णपणे टळे पर्यंत गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती डहाणू यांचा तो आदेश रद्द करत असल्याचे सांगितले. याबाबत जिल्हापरिषद कडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे तात्काळ कळवण्यात येईल असंही कामडी यांनी सांगितले.

३ एप्रिलच्या त्या पत्रकाबाबत पालघर जिल्हा शिक्षण अधिकारी(प्राथमिक) अनभिज्ञ असून अशाप्रकारे पत्र काढल्याची त्यांच्याकडे माहितीच नाही. आमच्या प्रतिनिधीने अशाप्रकारची माहिती मागवण्याची हि योग्य वेळ आहे का? याबाबत विचारणा केल्यानंतर पालघर जिल्हा शिक्षण अधिकारी(प्राथमिक) यांनी हि माहिती दिली.

  • “डहाणू मधील तो आदेश कोरोनाचे संकट पूर्णपणे टळे पर्यंत स्थगित करण्यात येत आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या जुन्या पत्रकावर कार्यवाही करत असताना हा प्रकार घडला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. अधिकाऱ्यांनी काम करत असताना वस्तुस्थितीचे भान राखणे गरजेचे आहे.” – भारती कामडी, अध्यक्ष जिल्हापरिषद पालघर
  • “राज्यसरकारच्या सप्टेंबर २०१९ च्या आदेशानुसार हि माहिती मागण्याचे आदेश मी संबंधित व्यक्तींना मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात दिले होते. त्यावेळी कोरोना संचारबंदी संबंधी कोणतेही आदेश राज्य वा केंद्र सरकारने दिले नव्हते.” – निलेश सांबरे, उपाध्यक्ष जिल्हापरिषद पालघर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here