पालघर साधू हत्याकांड: माझी आणि त्यांची नार्को टेस्ट करा; सत्य सर्वांसमोर येईल!

0
403
संग्रहित छायाचित्र

पालघर – योगेश चांदेकर:
“गडचिंचले गावात घडलेली घटना हि पूर्णतः गैरसमजातून व चोर आल्याच्या अफेवेतून घडली आहे. धार्मिक ध्रुवीकरण करू पाहणाऱ्या समाजकंटकांनी सुरुवातीला साधुंची हत्या मुस्लिमांनी केली असल्याची आवई उठवली. मात्र घटना घडली या भागात मुस्लिम लोकवस्ती नाही हे समोर आल्याने त्यांचा हा प्रयत्न पालघरसह महाराष्ट्रातील जागरूक नागरिकांनी हाणून पाडल्याने भाजपच्या महिला सरपंच चित्रा चौधरी यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ते मला व माझ्या पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. मात्र त्यांचा हा आरोप राजकीय भावनेने प्रेरित असून याप्रकरणातील सत्य बाहेर येण्यासाठी माझ्यासह सरपंच चित्रा चौधरी यांची नार्को टेस्ट करावी” अशी मागणी आपण तपासयंत्रणांकडे करणार असल्याचं परखड मतं राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे सदस्य काशिनाथ चौधरी यांनी मुंबई ई न्यूजला बोलताना व्यक्त केलं.

कोरोनाच्या संकटाच्या परिस्थितीत देखील या दुर्दैवी घटनेचं काहीजण राजकारण करत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. जे या घटनेचे प्रत्यक्षदर्शी नाहीत यांनी ऐकीव माहितीच्या आधारे घडलेल्या घटनेबाबत व्यक्त होणं चुकीचं असल्याचंही ते म्हणाले. “भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी सदर घटनेस मी व माझा पक्ष कारणीभूत असल्याचे अत्यंत बेजवाबदार ट्विट केले होते. त्याबद्दल आपण रीतसर तक्रार नोंदवली आहे. तसेच जे लोक बिनबुडाचे आरोप करत आहेत त्यांच्याविरुद्ध देखील कायदेशीर मार्गाने तक्रार नोंदवणार आहे” असं काशिनाथ चौधरी पुढे म्हणाले.

१६ एप्रिलला पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात तीन साधूंची जमावाने निर्घृण हत्या केली. पालघर जिल्ह्यातील कासा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणारे गडचिंचले हे महाराष्ट्र आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाच्या सीमेलगत असणारे गाव आहे. ही घटना घडल्यानंतर तीन दिवसांनी सोशल मीडियात या घटनेचा एक व्हिडीओ आला आणि त्याने सामाजिक वातावरण एकाएकी पेटले. अर्थातच अतिशय संवेदनशील आणि निंदनीय असणाऱ्या या घटनेच्या बद्दल देशभरात अनेकांनी तीव्र शब्दात आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या.

“गड चिंचले गावात चोर समजून इको कार अडविल्याची पोलीसांनी माहिती दिल्यानंतर मी त्यांच्यासोबतच घटनास्थळी आलो होतो. आम्ही त्याठिकाणी पोहोचलो त्यावेळी सरपंच, मी स्वतः व पोलीस संतप्त जमावाला साधूंना व वाहनचालकाला मारू नका म्हणून हात जोडून विनंती करत होतो. २००० च्या आसपास असणाऱ्या जमावाच्या पुढे आमचा इलाज चालला नाही. त्यांनी आमचं ऐकलं नाही आणि अमानुषपणे साधूंची व वाहनचालकाची हत्या केली. साधारणतः ७० ते ७५ आरोपींना ताब्यात घेईपर्यंत मी स्वतः पोलीसांसोबत उपस्थित होतो. पोलिसांची परवानगी घेऊनच मी घरी गेलो होतो.” असा खुलासाही त्यांनी बोलताना केला.

दरम्यान गडचिंचले गावच्या सरपंच चित्रा चौधरी यांनी “घटनास्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे सदस्य काशिनाथ चौधरी यांचे कार्यकर्ते होते. काशिनाथ चौधरी घटनास्थळी आल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपला दादा आला, असे ओरडून शिट्या मारायला प्रारंभ केला. मला राजकारण करायचे नाही; मात्र मी जमावाला ३ तास रोखून धरले. काशिनाथ चौधरी आणि पोलीस यांनी घटनास्थळी आल्यावर ग्रामस्थांना रोखण्यासाठी आवाज उठवला नाही.” असा आरोप केला होता. पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात झालेल्या हिंदु संतांच्या निर्घृण हत्येच्या प्रकरणी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा गंभीर आरोप केला होता.

चित्रा चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, “ज्या दिवशी ही घटना घडली, त्यावेळी मी स्वतः तिथं होते. बराच वेळ जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. तिघांना होणाऱ्या मारहाणीला मी विरोध करतच होते. मात्र, जमावाला शांत करत असताना, माझ्यावरच हल्ल्याचा प्रयत्न झाला. मी कशीबशी सुटका करून घेतली आणि घरी परतले. त्यानंतर माझ्या घरावरही दगडफेक झाली. आता मला आणि माझ्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळं मला आणि कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्यात यावं” अशी मागणीही त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here