संपादकीय: देवाच्या काठीला आवाज नसतो पण दणका जबरदस्त बसतो..!

0
659

संपादकीय (योगेश चांदेकर):

कालचा ६ मार्च हा दिवस महाराष्ट्रातील काही राजकारण्यांसाठी आठवणीत राहणारा असाच ठरला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 85 जिल्हा परिषदेच्या व 116 पंचायत समितीच्या जागा रिक्त केल्या. रिक्त झालेल्या सर्व जागांवर आता पोटनिवडणुक घेण्यात येणार आहे. नागपूर जिल्हा परिषद खालोखाल पालघर जिल्ह्यातील तब्बल १५ जागा रिक्त करण्यात आल्या आहेत. थोड्या थोडक्या वेळेत देखील काहींनी जिल्हा परिषदेत आपलं चांगलंच बस्तान बसविल्याचं पहावयास मिळालं होतं. काहीजण अमरत्वाचा पट्टा बांधून आल्याप्रमाणे पदाचा दुरुपयोग वैयक्तिक हेवेदाव्यात तसेच दहशत बसविण्यासाठी करत होते. कदाचित ‘त्या’ विद्यमान व आता या निर्णयामुळे माजी झालेल्या सदस्यांना, पदाधिकाऱ्यांना नियती कोणत्याही क्षणी पुढ्यात काहीही वाढवून ठेवू शकते याचा विसर पडला असावा असेच म्हणावे लागेल.

दरम्यान या निर्णयामुळे रिक्त करण्यात आलेल्या जागांमध्ये 85 सदस्य नागपूर, धुळे, वाशीम, पालघर, नंदुरबार, अकोला जि. प. चे आहेत. आरक्षणाची टक्केवारी 50 टक्के पेक्षा जास्त होत असल्याने तसेच ती 50 टक्केच्या आत बसवावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार 50 टक्के आरक्षणातून अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण वजा करून उरलेल्या टक्केवारीत ओबीसींचे आरक्षण बसवावे असे स्पष्ट केले असल्याने, राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या सहाही जि. प. व पं. स. च्या सदसयाचे सदस्यत्व रद्द केले. निवडणूक आयोग या रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक घेण्यासाठी आता स्वतंत्र कार्यक्रम जाहीर करणार आहे.

अर्थात चांगलं काम करणाऱ्या लोकांना यावेळी देखील संधी मिळू शकते. असाही एक काळ होता ज्यावेळी जनता जनार्दनाची सेवा हे लोकप्रतिनिधींचे ब्रीद होत. आता राजकारणाकडे व्यावसायिकता म्हणून पाहण्याचा ट्रेंड येऊ पाहतोय. निवडून आल्यानंतर जनतेसोबतची नाळ तोडणारे यामध्ये टिकणार नाहीतच असंही नाही पण जमिनीपासून चार बोटं वरून चालणारी लोक धपकन आपटणार यामध्ये तिळमात्र शंका नाही. मुंह में राम बगल में ‘छुरी’ असा सुशीलतेचा आव आणणाऱ्या राजकारण्यांना मात्र हा मोठा झटका आहे. त्यामुळे अमरत्वाचा पट्टा बांधून आल्याच्या अविर्भावात राहणाऱ्यांना या निर्णयाने जमिनीवर आणलं आहे.

पालघर जिल्हा परिषद सदस्य रद्द झालेल्या जागा पुढीलप्रमाणे:-

 • अक्षय प्रवीण दवणेकर (5- उधवा, तलासरी) माकप
 • हबीब अहमद शेख (28- आसे, मोखाडा) (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
 • राखी संतोष चोथे, (29- पोशेरा, मोखाडा) (भाजप)
 • रोहिणी रोहिदास शेलार (31- गारगांव, वाडा) (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
 • अक्षता राजेश चौधरी (33 – मांडा, वाडा) (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
 • शशिकांत गजानन पाटील (34- पालसई, वाडा) (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
 • नरेश वामन आकरे (35- आबिटघर, वाडा) (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
 • विनया विकास पाटील (47- सावेरे एंबूर, पालघर) (शिवसेना)
 • अनुश्री अजय पाटील (48 – नंडोरे देवखाप, पालघर) (भाजप)
 • निलेश भगवान सांबरे (23 – अलोंडे, विक्रमगड) (अपक्ष- राष्ट्रवादी कॉंग्रेस सहयोगी)
 • अनुष्का अरुण ठाकरे (23 – मोज, वाडा) (शिवसेना)
 • सुशील किशोर चुरी ( 18 – वणई, डहाणू) (शिवसेना)
 • सौ. ज्योती प्रशांत पाटील (6 – बोर्डी, डहाणू) (भाजप)
 • सौ. जयश्री संतोष केणी (11- कासा, डहाणू) (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
 • सुनील दामोदर माच्छी (15- सरावली, डहाणू) भाजप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here