मुंबई:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता देशवासियांना संबोधित केले. कोरोनाशी लढ्यात महत्वपूर्ण भूमिका निभावत असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. देशातील जनतेने लॉक डाऊन गंभीरतेने घ्यावा असं आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केलं. देशवासीयांच्या मनात नकारात्मकतेने घर करू नये यासाठी त्यांनी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील विजेचे बल्ब बंद करून तेलाचे दिवे, मेणबत्त्या अथवा मोबाईलमधील फ्लॅश लाईट लावण्याचे आवाहन केले. जनता कर्फ्यूच्या वेळेस लोक बहुसंख्येने एकत्र एकत्र आले होते त्यामुळे यावेळी त्यांनी स्पष्टपणे असे न करण्याविषयी आवाहन केलं. यानंतर काही राजकीय नेत्यांनी त्या आवाहनाचं समर्थन केलं तर काहींनी विरोध केला. सोशल मीडियावर यावर विरोधाची बरीच राळ उडत असताना आता वीज क्षेत्रातील तज्ञांनीच हे कसे चुकीचे आहे याच स्पष्टीकरण देण्यास सुरुवात केली आहे.
“पंतप्रधान मोदीजींच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशवासीयांनी ५ एप्रिल रोजी ९ वाजता अचानक लाईट बंद केली तर ग्रीड फेल होऊन सर्व पॉवर स्टेशन High frequency वर ट्रीप होतील. सगळीकडं अंधार पसरेल. राज्यातील ग्रीड failure मुळे सर्व पावर स्टेशन बंद पडले तर, मल्टि स्टेट ग्रीड failure होईल आणि संपूर्ण देश अंधारात जाईल. सगळ्या अत्यावश्यक सेवा बंद पडतील. परिस्थिती मुळ पदावर यायला आठवडा लागेल.” असं वीज क्षेत्रातील तज्ज्ञांचं मत आहे. या तज्ज्ञांच्या म्हणण्यात तथ्य असेल आणि पंतप्रधानांनी त्याची वेळीच दखल घेतली नाही तर देशात अनर्थ होऊ शकतो. त्यामुळे या आवाहनाविषयी मोदीजी काय निर्णय घेतात वा तज्ज्ञांचा दाव्यात कितपत तथ्य आहे याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.