पालघर: त्या वीटभट्टी मालकाविरुद्ध मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0
388

पालघर – योगेश चांदेकर:

काटाळे येथील वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगाराच्या ३ वर्षीय कोरोनाबाधित मुलीच्या संपर्कात आल्याने काही जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्या वीटभट्टी कामगारास कामाच्या ठिकाणीच ठेवून न घेतल्याप्रकरणी तसेच संबंधित बाब प्रशासनाला न कळविल्याप्रकरणी वीटभट्टीमालका विरुद्ध मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाबाधित मुलीच्या आईवडिलांना बळजबरीने त्यांच्या घरी जाण्यास भाग पाडले आणि कोरोनाचा संसर्ग होण्यास मदत होणारे कृत्य केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

दरम्यान कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. तातडीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी पालघर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्यांनी कामाच्या ठिकाणी असणाऱ्या व्यक्तींना जेथे आहेत त्याच ठिकाणी थांबण्याचा आदेश दिला होता. तसेच ज्या उद्योगामध्ये कामगार काम करत आहेत त्या उद्योजकांना/मालकांना त्यांच्या राहण्याची व खाण्या-पिण्याची सोया करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे वीटभट्टी मालकाने त्या कामगार दाम्पत्यास व मुलीस कामाच्या ठिकाणीच ठेवून तिच्या आजाराबाबत प्रशासनास कळवणे गरजेचे होते असे फिर्यादीने म्हटले आहे.

मनोर पोलीस ठाण्यात याप्रकरणी भा. द. वि. स. कलम १८८,२६९,२७०,२७१ सह आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ब रोगनियंत्रण अधिनियम १९९७ चे कलम २,३,४ तसेच सह कोविड-१९ उपाययोजना २०२० चे कलम ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here