पालघर: शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणी आरोपींची थेट पोलीस कोठडीत रवानगी..!

0
491

पालघर – योगेश चांदेकर:

संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनलेल्या रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांना लुबाडल्याच्या आरोपाखाली मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर मनोर पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली होती. आरोपींना पालघर न्यायालयात हजर केले असता आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई ई न्यूजने याबाबत बातमी प्रसिद्ध करून या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करून अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या लढ्याला ताकद देण्याचे काम केले. आरोपी मधुकर सखाराम काकरा (रा. कोल्हाण), नारायण कान्हा डबके (रा. कोंडगाव), रुपेश पांडुरंग पाटील, दोषीराम कमळाकर घाटाळ, जानू रामा मोर यांच्यावर कलम ४२०, ३८४, ३८५, ५०४, ५०६, ३४ अन्वये मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत आरोपींनी शेतकऱ्यांना मिळालेल्या नुकसान भरपाईमधील ३५ टक्के रक्कम लुबाडल्याचा आरोप होता. मनोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी शेतकऱ्यांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल होईपर्यंत योग्य पद्धतीने काम केले आहे. या प्रकरणाचा तपास आता पालघर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग करणार असून या विभागाकडून देखील योग्य पद्धतीने शेतकऱ्यांना न्याय मिळण्याच्या भूमिकेने तपास होईल, अशी अशा पालघरवासियांना आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे विभागाचे पोलीस उपनिरीक्षक प्रताप भोस हे करत आहेत.

मुंबई ई न्यूजचे पालघर विभागीय संपादक योगेश चांदेकर व सामाजिक कार्यकर्ते विजय वझे यांनी या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतली. पोलीस अधीक्षक पालघर यांच्याकडे याप्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपींवर कारवाईची मागणी फडणवीस यांनी केली होती. तसेच फडणवीस यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्याची भूमिका घेतलेली असल्याने व शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याने खंत व्यक्त केली. याप्रश्नी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना कठोर शासन होण्यासाठी शेवटपर्यंत पाठपुरावा करण्याचा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना मुंबई ई न्यूजच्या माध्यमातून बोलताना दिला होता.

मुंबई ई न्यूज या प्रकरणी पाठपुरावा सुरूच ठेवणार असून बाधित शेतकऱ्यांनी निमूटपणे अन्याय सहन न करता 72766 44464 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन देखील आम्ही करत आहे. शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्यांना कठोर शासन व्हावं यासाठी मुंबई ई न्यूज यापुढेही आग्रही असणार आहे.

“हा गुन्हा शेतकऱ्यांशी संबधित असून तितकाच संवेदनशीलही आहे. त्यामुळे तक्रार झाल्यानंतर तात्काळ दखल घेऊन प्रकल्प बाधितांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस दल सर्वोतोपरी प्रयत्नशील आहे. या गुन्ह्यात सामील असणाऱ्या सर्व गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा देण्यासाठी पोलीसदल पाठपुरावा करणार आहे.” – पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे (पालघर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here