MUMBAI e NEWS :
नवी मुंबईत आयोजित भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश राज्य परिषदेला चंद्रकांत पाटील संबोधित करत होते. यावेळी बोलताना शिवसेनेने सत्तेसाठी आपली सर्व तत्व गुंडाळून मातोश्री बंगल्याच्या एका कोपऱ्यात ठेवली आहेत, आणि हे सरकार महाराष्ट्राच्या जनतेची घोर फसवणूक करत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करेल, असा निर्धार भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.

चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीला सत्ता स्थापनेसाठी आणि देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री बनण्यासाठी स्पष्ट जनादेश दिला होता. मात्र, स्वत:च्या मुलाला मुख्यमंत्री बनवण्याच्या महत्वाकांक्षेसाठी या जनादेशाचा अनादर शिवसेनेने केला. सत्तेसाठी शिवसेने हिंदुत्वाच्या तत्वाला मूठमाती दिली. सत्तालालसे पायी महापुरुषांचा अपमानही शिवसेना आज सहन करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना मध्य प्रदेशमधील कॉंग्रेस सरकार करत आहे. पण त्यावरही शिवसेना नेते बोलायला तयार नाही. सत्तेसाठी शिवसेनेने आपली सर्व तत्वं गुंडाळून मातोश्री बंगल्याच्या कोपऱ्यात ठेवली आहेत.

यावेळी भाजप पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डाजी, प्रदेश प्रभारी सरोज पांडे, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतिशजी, प्रदेश संघटक विजयराव पुराणिक, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पियुष गोयल, भारतीय जनता पक्षाचे नेते विनयजी सहस्रबुद्धे, पंकजाताई मुंडे, एकनाथ खडसे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि भाजप नेते उदयनराजे भोसले, नारायण राणे, आमदार गणेश नाईक, मंदाताई म्हात्रे यांच्यासह प्रदेश कार्यकारिणीचे प्रमुख पदाधिकारी तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here