सांगली जिल्ह्यात कोरोनाचे ‘चार’ रूग्ण, सर्वत्र खळबळ!

0
385

सांगली। जगभर धुमाकूळ घातलेल्या “कोरोना’ ने सांगली जिल्ह्यात देखील प्रवेश केला असून सांगलीत तब्बल चार रूग्ण आढळले आहेत. हे चौघे रूग्ण इस्लामपूरचे असून नुकतेच सौदी अरेबियातून हज यात्रा करून परत आले आहेत. या चौघांचा रिपोर्ट “पॉझिटीव्ह’ आल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. संबंधित चौघांना मिरजेतील सिव्हील हॉस्पिटलच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान सिव्हीलच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलेल्या १२ जणांचा अहवाल मात्र “निगेटिव्ह’ आल्याने दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रातील मुंबई-पुणेमध्ये कोरोना बाधित रूग्ण आढळल्यामुळे सांगली परिसरात गेले काही दिवस चिंता होती. सांगलीमध्ये कोरोना येणार तर नाही ना? याची धास्ती सर्वांना होती. त्यामुळेच कोरोनाचा प्रसार होणारी साखळी तोडण्यासाठी सांगलीकरांनी जनता कर्फ्यूला शंभर टक्के प्रतिसाद दिला. सांगली, मिरज, भारती हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आयसोलेशन वॉर्ड बनवण्यात आले होते. कोरोना बाधित देशातून आलेल्या २३ जणांना आतापर्यंत त्या वॉर्डात ठेवले होते. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. परदेशवारी केलेल्या चारशेहून अधिक प्रवाशांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

दरम्यान तीन दिवसापूर्वी १२ संशयितांना आयसोलेशन वॉर्डात दाखल केले होते. त्यापैकी एक विटा, आष्टा, जत परिसरातील होते. त्यांचे अहवाल तीन दिवसापासून प्रलंबित होते. त्यांचा अहवाल निगेटिव्ह असल्याचे आज निष्पन्न झाले. ही बातमी दिलासा देणारी असतानाच आज अचानक इस्लामपूर येथील एकाच कुटुंबातील चौघांना कोरोना झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली. हे चौघेजण नुकतेच सौदी अरेबियातून हज यात्रा करून आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी चौघांना कोरोना झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here