पालघर: अंत्योदय लाभार्थ्यांना मिळणाऱ्या धान्यात घपला..!

0
357

पालघर – योगेश चांदेकर:

भिवंडी तालुक्यातील अनेक रेशन दुकानदार आदिवासी, गरीब अंत्योदय, प्राधान्य कुटुंब कार्ड धारकांना निर्धारित प्रमाणापेक्षा कमी रेशन देत आहेत, या संकट काळात देखील रेशन दुकानदारानी गरिबांच्या तोंडचा घास पाळविण्याचे पातक केल्याने श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी संताप व्यक्त केला. अशा दुकानांची तपासणी करून अपहार असेल तर गुन्हे दाखल करून भ्रष्ट रेशन यंत्रणेला दणका देण्याचे काम आता श्रमजीवी संघटना करत आहे. आज भिवंडी तालुक्यातील चाणे आणि पालखणे या दोन गावातील दुकानदारांनी केलेल्या अपहाराची तक्रार करत पुरवठा विभागाला दोन्ही दुकानदारांवर अत्यावश्यक सेवा अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करायला लावले असून या पुढेही कार्यकर्ते प्रत्यक्ष जाऊन रेशन दुकानांचा पंचनामा करून तक्रार दाखल करणार असल्याची माहिती मिळते आहे. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित स्वतः याबाबत लक्ष देऊन आहेत. एकतर गरीब भुकेने विव्हळत असताना त्यांच्या तोंडचा घास पळविणाऱ्याला अजिबात क्षमा करणार नाही अशी स्पष्ट भूमिका पंडित यांनी घेतली असून यापुढे तरी रेशन दुकानदारांनी अशी चूक करू नका असे आवाहन त्यांनी केले आहे.

मौजे घोडावडवली येथे राहणारा रेशनिंग दुकानदार श्री . धनंजय चंद्रकांत भोईर हा त्याच्या दुकानातील 1 ) सविता सखाराम सावरा 2 ) भरत लक्ष्मण वाघे 3 ) राजू सख्या सावरा 4 ) आशा एकनाथ वाघे 5 ) सनिता सरेश वाघे 6 ) लक्ष्मी लक्ष्मण वाघे सर्व रा . लोहारपाडा – पालखणे या गरीब लोकांना शासनाने मंजुर केलेले धान्य, गहु , साखर कमी प्रमाणात देतो अशी तक्रार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडे होती, याबाबत संघटनेचे कातकरी घटक जिल्हा प्रमुख जयेंद्र गावीत यांनी प्रत्यक्ष दुकानास भेट दिली, कार्ड धारकांशी बोलले, आणि धान्य कमी दिल्याचे निश्चित होताच पंचनामा करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

याबाबत अधिकाऱ्यांनी पाहणी केली तेव्हाही कमी धान्य दिले असल्याचे निदर्शनास आले, 25 किलो ग्रॅम तांदुळाऐवजी 20 किलो तर 10 किलो गहू ऐवजी 5 किलो दिले गेले, मात्र दुकानदारांकडे असलेल्या शासनाने दिलेल्या मशिनमध्ये अधिकाऱ्यांनी ऑनलाईन धान्य चेक केले असता रेशनिंग कार्डावर शासनाच्या नियमाप्रमाणे असलेले 25 किलो तांदुळ व 10 किलो गहु व 01 किलो साखर दिले गेल्याची नोंद दिसुन आली.

असाच प्रकार चाणे येथील रेशन दुकानदार सुदाम लहू पाटील यांनी देखील केला, 15 ऐवजी 10 किलो तांदूळ आणि गहु 10 किलो ऐवजी 5 किलो देऊन अपहार केला. या ठिकाणी देखील श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाने जयेंद्र गावित आणि सहकाऱ्यांनी पंचनामा करत हा अपहार बाहेर काढला. सोबत जया पारधी, आशा भोईर, केशव पारधी इत्यादी कार्यकर्ते देखील होते. याबाबत आज श्रमजीवी संघटनेच्या पाठपुराव्याने गणेशपुरी पोलीस ठाण्यात पुरवठा निरीक्षक विजय कोये यांच्या फिर्यादीने दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले असून सपोनि महेश सागडे यांच्या मार्फत पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here