संजय गांधी निराधार, श्रावणबाळ यांसह वृद्ध, निराधार अंध दिव्यांग, विधवा, परित्यक्त्या यांना तीन महिन्यांचे मानधन एकत्रित मिळणार!

0
379

मुंबई:
कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या एकूण परिस्थिती मुळे सरकारने सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार, श्रावणबाळ यांसह पाच योजनांसाठी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

संजय गांधी निराधार श्रावणबाळ आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन अशा पाच योजनेतील जवळपास ३५ लाखाहून अधिक लाभार्थींना एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे मानधन एकत्रित ऍडव्हान्स देण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांमधून राज्यातील जवळपास ३५ लाख लाभार्थींना तीन महिन्यांचे एकत्रित मानधन देण्यासाठी १२५७ कोटी ५० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना सुद्धा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत तब्बल १२५७ कोटी ५० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी वित्त आणि नियोजन विभागाने त्यास मान्यता दिली आहे. त्याबद्दल मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहे. या योजनांच्या अंतर्गत राज्यातील गोरगरीब वंचित, वार्षिक उत्पन्न रुपये २१ हजार पेक्षा कमी असलेले वृद्ध, निराधार, अंध, दिव्यांग, विधवा, परित्यक्त्या, देवदासी अशा उपेक्षितांची या कठीण काळात परवड होऊ नये यासाठी राज्य शासनाच्या इतर विभागांच्या बरोबरीने सामाजिक न्याय विभाग भक्कमपणे या परिस्थीत नागरिकांच्या पाठीशी उभा आहे असा विश्वास सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.
येत्या दोन दिवसात जिल्हानिहाय निधी वितरणाची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होणार आहे. लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यांवर एकत्रित हे मानधन वितरित करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here