पालघर – योगेश चांदेकर:
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात वाहक म्हणून कार्यरत असलेल्या देविदास जयसिंग राठोड यांनी कार्यतत्परता आणि कर्तव्याचा वेगळाच आदर्श सर्वांसमोर ठेवलाय. कोरोना संकटाच्या काळात, अत्यावश्यक सेवा बजावण्याचं काम देविदास यांच्याकडे आहे. ड्युटीवर जाण्यासाठी देविदास यांना सध्या दररोज 19 किमीची पायी पायपीट करावी लागत आहे आणि इतके असूनही त्यांची याबाबत जराशीही तक्रार नाही.
देविदास राठोड पालघर एसटी आगारात वाहक म्हणून 17 वर्षांपासून कार्यरत आहेत. तर मनोर या गावी ते आपल्या कुटुंबासह राहतात. मात्र, सध्या लॉकडाऊन असल्याने ते कर्तव्यावर हजर होण्यासाठी चक्क 19 किमीचा पायी प्रवास करत आहेत. जर कुणी लिफ्ट दिली, तर थोडासा आराम त्यांना मिळतो. देविदास हे सध्या पालघर येथून सेंट्रल मुंबई डेपोमध्ये बसची वाहतूक करत आहेत. मुंबईतील केईएम रुग्णालयात २५ डॉक्टर आणि नर्स यांना पोहचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. या जबाबदारीच्या पूर्तीसाठी त्यांना मोठी कसरत करावी लागत असून ते आपलं कर्तव्य चोखपणे बजावत आहेत.
देविदास हे आपल्या मनोर गावातील घरापासून पाण्याच्या दोन-तीन बाटल्या घेऊन धावत पालघरच्या दिशने निघतात. वाटेत अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या ट्रक्सना हात करुन कधीकाळी लिफ्ट मागतात. एसटी महामंडळात आपण वाहक असून अत्यावश्यक सेवा देण्याची जबाबदारी असल्याचं पास दाखवून ते ट्रक ड्रायव्हरला सांगतात. त्यानंतर, ट्रक ड्रायव्हर पालघरपर्यंत त्यांना आपल्या वाहनातून सोडतात. देविदास यांचा हा दिनक्रम सुरूच आहे. मात्र, रविवारी तब्बल 19 किमीपर्यंतचा पायी प्रवास( धावत) या वाहकाला करावा लागला. कारण, रविवारी बऱ्यापैकी ट्रक चालकांनी सुट्टी घेतली होती. त्यामुळे देविदास यांना पालघर गाठण्यासाठी चक्क 19 किमी धावत जावे लागले. तितकंच अंतर रिटर्न येताना पायीच यावं लागलं. आपल्या ड्युटीवर वेळेत पोहोचण्यासाठी त्यांनी चक्क स्वत: सोबतच मॅरेथॉन सुरु केली अन् ती जिंकली आहे. सध्या दररोज सकाळी ६ वाजता पालघर येथील आपल्या डेपोत ते ड्युटीसाठी हजर राहतात. त्यानंतर, दुपारी ३ वाजता दादर येथून बस घेऊन पालघरला सायंकाळी ५ वाजता पोहोचतात. त्यानंतर, त्यांचा पुढील मनोर येथे 19 किमीचा रिटर्न प्रवास सुरु होतो.
“डॉक्टर आणि नर्सेस हे माझे दैनंदिन प्रवासी आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत ते आपलं महत्वाचं योगदान देत आहेत. मग, मी त्यांना असं सोडू शकत नाही.” – देविदास राठोड, वाहक
देविदास यांना पूर्वीपासूनच धावायची आवड आहे, म्हणूनच डयुटीवर जाण्यापूर्वी दररोज सकाळी रनिंग करतात. या आवडीतूनच त्यांनी कित्येकवेळा मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. राठोड यांच्या कर्तव्यदक्षतेचं पालघरमध्ये सर्वत्र कौतुक केलं जातंय

देविदास यांना आता पर्यंत मिळालेले पुरस्कार:
- 21 किमी मॅरेथॉन स्पर्धेत राष्ट्पती पुरस्कार 14 मे 2012
- 2015, 2016, 2017, 2018, 2019 पाच वर्षे वसई ऑलस्टिक 21 किमी मॅरेथॉन प्रथम
- 2019 पोलीस कमिशनर नाशिक केनियाच्या स्पर्धा 5 वा क्रमांक
- जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था झाडपोली अयोजित 21 किमी प्रथम क्रमांक
- कोल्हापूर मॅरेथन 21 किमी 4 था क्रमांक
- नागपूर मॅरेथॉन 21 किमी 5 वा क्रमांक (18 हजार स्पर्धक)
- पुणे मॅरेथॉन 21 किमी 6 वा क्रमांक
- नाशिक लोकमत आयोजित 21 किमी 4 था क्रमांक