‘हेपेटायटीस’ म्हणजे कावीळ हा यकृताचा विकार आहे. या आजाराचे वेळीच निदान व उपचार न झाल्यास रूग्णाच्या जीवावर बेतू शकतं. त्यामुळे हेपेटायटीस या विकाराबद्दल पुरेशी माहिती आणि लक्षणे समजून घेणं गरजेचं आहे.

परळ येथील ग्लोबल रूग्णालयातील सल्लागार हिपॅटालॉजिस्ट डॉ. अमित गुप्ते यांनी सांगितले की, २०१६ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) च्या आकडेवारीनुसार ४० दशलक्ष लोक हिपँटायटीस बी या आजाराने पिडित आहेत. तर ६ ते १२ दशलक्ष लोकांना हेपेटायटीस सी ची लागण झालेली आहे. त्यामुळे यकृताचा दाह ही एक समस्या म्हणून समाजात डोकेवर काढू लागली आहे. हेपेटायटीस विषाणूंमुळे होणाऱ्या विकारामुळे रोगी व्यक्तीच्या कुटुंबियांना उपचारांचा आर्थिक भार सहन करावा लागत आहे. विशेषतः हेपेटायटीस या विकार यकृताच्या कर्करोगाचे प्रमुख कारण आहे.

हेपेटायटीस या आजाराचे दोन प्रकार आहेतः-

१) हेपेटायटीस ए आणि ई
२) हेपटायटीस सी आणि बी

हेपेटायटीसची कारणेः

१) हेपेटायटीस ए:-
हेपेटायटीस ‘ए’ हा एक संसर्गजन्य आजार आहे. यामुळे यकृताला सूज येणं किंवा जळजळ होणं अशी समस्या उद्भवते. शरीरात दुषित घटक गेल्यास किंवा दुषित अन्न किंवा दुषितपेयांचे सेवन केल्यास लागण होऊ शकते. बहुतांश संसर्ग हा घरातूनच एखाद्या व्यक्तीकडून होतो. या आजारात भूक न लागणे, ताप येणं, थकवा जाणवणं, मळमळ व उलट्या होणे, गडद रंगाची लघवी, पोटदुखी आणि त्वचा-डोळे पिवळे पडणे ही लक्षणे दिसू लागतात. साधारणतः आठवडाभर ही लक्षणं दिसतात. त्यानंतर योग्य उपचार घेतल्यास यातून सुखरूप बाहेर पडता येऊ शकतं. परंतु, वेळीच उपचार न झाल्यास यकृत निकामी होण्याचा धोका वाढतो. अशावेळी रूग्णाला तातडीने रूग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. बऱ्याचदा काही प्रकरणांमध्ये त्वरीत यकृत प्रत्यारोपणाची गरज भासू शकते.
हेपेटायटीस ‘ए’ या आजाराच्या प्रतिबंधासाठी लस उपलब्ध आहे. परंतु, या आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी पौष्टिक आहार, खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे आणि वैयक्तिक स्वच्छता राखणे गरजेचं आहे. तरंच या आजाराला दूर ठेवू शकतो.
२) हेपेटायटीस ईः-
हा विकार हेपेटायटीस ‘ए’ सारखाचं आहे. विशेषतः गर्भवती महिलांमध्ये अँक्यूट लिव्हर फेल्युअरची समस्या उद्भवू शकते. आतापर्यंतहेपेटायटीस या आजारावर कोणतेही लस उपलब्ध नाही. त्यामुळे या आजाराबाबत दिलेल्या नियमावलीचं कठोर पालन करणे आवश्यक आहे.
३) हेपेटायटीस बीः-
हेपेटायटीस बी हा सुद्धा एक संसर्गजन्य आजार असून यकृतावर आघात करतो. हेपेटायटीस ए आणि ई विषाणूंच्या तुलनेत हेपेटायटीस बी हा विषाणू संक्रमित व्यक्तीच्या यकृतात जास्त काळ टिकतो. यामुळे काही रूग्णांना यकृताचा आजार जसे, फायब्रोसिस, सिरोसिस(कायमस्वरूपी यकृत खराब होणे) आणि यकृताचा कर्करोग होऊ शकतो. याकरता एखाद्या रूग्णालाहेपेटायटीस बीची लागण झालेली आहे किंवा नाही हे वैद्यकीय चाचणी करून तपासून पाहणे आवश्यक आहे. हेपेटायटीस बी या आजारावर प्रभावी औषधोपचार उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, वीर्य, योनिमार्गातील द्रव आणि रक्तासारख्या शरीरातील द्व्यांशी संपर्क आल्यास व्यक्तीला हेपेटायटीस बी व्हायरसची लागण होऊ शकते. याशिवाय प्रसूतिदरम्यान, रक्त संक्रमणातून, असुरक्षितलैंगिक संबंध आणि आईपासून नवजात बाळाला हा आजार होऊ शकतो. हेपेटायटीस बीसाठी एक प्रभावी लस उपलब्ध आहे आणि आता ही लस लसीकरण मोहिमेत समाविष्ठ करण्यात आली आहे.
४) हेपेटायटीस सी:-
या आजारात हेपेटायटीस बी सारखीच लक्षणे असतात. या आजारात यकृताचा सिरोसिस किंवा यकृताचा कर्करोग होऊ शकतो. या आजारावर औषधोपचार उपलब्ध असून ही औषध तीन ते सहा महिन्यांमध्ये घ्यावी लागतात. हेपेटायटीस सी आजाराची लक्षणे ओळखणे आणि यकृताचे नुकसान होण्यापूर्वी तातडीने निदान व उपचार करणे आवश्यक आहे.

हेपेटायटीस विकाराची प्रमुख लक्षणेः-
• थकवा जाणवणे
• मळमळ आणि उलट्या
• ओटीपोटात वेदना होणे
• अस्वस्थता व बैचेनी वाटणे
• भूक न लागणे
• लघवीचा रंग पिवळा होणे
• सांधेदुखी, त्वचेचा रंग बदलणे, स्नायू दुखणे, खाज सुटणे, सांधेदुखी

हेपेटायटीस ए आणि ई या विषाणूंची लागण होण्यापासून रोखता येऊ शकते. यासाठी हेपेटायटीस बी आणि सीची तपासणी करणे आवश्यक आहे. जर ते नकारात्मक असेल तर, हेपेटायटीस बीची लस घेणे आवश्यक आहे. सकारात्मक असल्यास प्रभावी आणि वेळेवर उपचारांसाठी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here