रिलायन्स पाईप लाईन बाधित शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपोषण

0
439

पालघर : (मुंबई ई न्यूज नेटवर्क)

रिलायन्स पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांनी आपल्या विविध न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी आज दिनांक ७ तारखेपासून पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे. या उपोषणात मुंबई ई न्युजचे पालघर विभागीय संपादक योगेश चांदेकर, सामाजिक कार्यकर्ते विजय वझे यांच्यासह ८ बाधित शेतकरी सहभागी आहेत. तसेच उपोषणाला १५० शेतकऱ्यांनी सोशल डिस्टंसिंग आणि कोरोनाच्या पार्श्वभुमीवर काळजी घेत आपले जाहीर समर्थन दिले आहे.

प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी १५ दिवसांपूर्वी प्रतिज्ञापत्र सादर करत कासा पोलिस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दिला होता. यामध्ये बाधित शेतकऱ्यांना फसवणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली होती. शेतकऱ्यांना मोबदला मिळवून देण्याच्या नावाखाली ३५ टक्के रक्कम उकळणाऱ्या मंडळीमध्ये काही राजकीय पदाधिकारी आणि पत्रकार लोक देखील सहभागी असून त्यांच्यावर अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच या प्रकरणात ज्या आरोपींवर गुन्हा दाखल झाला त्यांना अजूनही अटक केली जात नसून ते मोकाट फिरत आहेत. या आरोपींकडून बाधित शेतकऱ्यांना धमकवण्याचे, जीवे मारण्याच्या धमक्या देण्याचे प्रकार सातत्याने घडत असूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही, त्यामुळे हे उपोषण सुरू करण्यात आल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

सन २०१७ पासून रिलायन्स कंपनीने कोकण विभागात गॅस पाईपलाईनचे काम हाती घेतले आहे. परंतु सदर काम करताना रिलायन्स कंपनीने शासकीय नियमांची पायमल्ली केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना, ग्रामस्थाना योजनेची माहिती न देताच सदर प्रकल्प रेटण्याचे काम केले आहे. काही ठिकाणी बळजबरीने शेतकऱ्यांच्या जमीनी ताब्यात घेतल्या आहेत. कंपनीच्या या गैरकारभारात काही राजकीय पदाधिकारी आणि पत्रकार मंडळी देखील सहभागी असून अनेकांनी शेतकऱ्यांना मोबदला मिळवून देण्याच्या नावाखाली ३५ टक्क्यांची रक्कम जबरदस्तीने उकळली आहे. असे अनेक गैरप्रकार कंपनीने केले असून गोरगरीब आदिवासी शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान या प्रकरणी आतापर्यँत ६ आरोपींना अटक करण्यात आली असून यातील ४ आरोपी फरार आहेत तर याबाबतचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.

  • बाधित शेतकऱ्यांना धमकावून त्यांच्या जमीनी ताब्यात घेण्याचे प्रकार रिलायन्सच्या दलालांनी केले आहे. यातून अनेक शेतकऱ्यांना शिवीगाळ, मारहाण असे प्रकारही घडलेले आहेत. त्यामुळे प्रशासनाने अशा लोकांना पाठिशी न घालता त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय वझे यांनी केली आहे. 
  • आदिवासी शेतकऱ्यांना कंपनीच्या गैरकारभारात सामील असणारे गुंड गावात येऊन शिवीगाळ करतात, जीवे मारण्याच्या धमक्या देतात. त्यामुळे आमच्या जिवीतास धोका असून रिलायन्स कंपनी आणि त्यांना मदत करणाऱ्या सर्वांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी यावेळी किरण सुर्वे या शेतकऱ्याने केलीय. 
  • रिलायन्स कंपनीच्या गैरकारभारात मदत करणाऱ्या व शेतकऱ्यांकडून ३५ टक्के रक्कम संघटितपणे काढून घेणाऱ्या सूत्रधारांसह त्यांनी नेमलेल्या एजंटांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी लहू पाटील या शेतकऱ्यांनी केलीय.  

मागण्यांच्या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब, विरोधीपक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे गृहमंत्री अनिलजी देशमुख साहेब, जिल्हाधिकारी साहेब पालघर , पोलिस अधिक्षक साहेब पालघर, पोलिस निरिक्षक पालघर, सातपाटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना देण्यात आली आहे. तसेच जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत हे बेमुदत आमरण उपोषण सुरू राहणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here