पालघर: सर्व मागण्या मान्य; अखेर आठव्या दिवशी उपोषण मागे..!

0
389

पालघर – योगेश चांदेकर:

रिलायन्स पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांचे ७ सप्टेंबरपासून सुरु असणारे आमरण उपोषण आज मागे घेण्यात आले. या प्रकरणातील आरोपींना अटक करावी यासह इतर प्रमुख १३ मागण्यांसाठी हे उपोषण सुरु होते. आज आठव्या दिवशी जिल्हा प्रशासनाने सर्व मागण्यांविषयी लेखी आश्वासन दिल्यानंतर सरबत ग्रहण करत उपोषण मागे घेण्यात आले.

सामाजिक कार्यकर्ते विजय वझे व मुंबई ई न्यूजचे पालघर विभागीय संपादक योगेश चांदेकर यांच्या नेतृत्वाखाली ७ सप्टेंबर पासून आमरण उपोषणाचे शस्त्र उपसण्यात आलं होत. उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शेकडो शेतकरी उपोषणस्थळी तळ ठोकून होते. उपोषणाला अधिक धार देण्यासाठी सोमवार पासून हजारो शेतकरी धरणे आंदोलनासाठी जमले होते. त्यामुळे आंदोलकांच्या मागण्या गांभीर्याने घेत त्या मान्य करण्याबाबत योग्य कार्यवाही करण्याचे आश्वस्त करत उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली. विकास नाईक, उपविभागीय पोलीस अधिकारी पालघर विभाग आणि संदीप पवार, सक्षम प्राधिकारी दहेज नागोठणे इथेन पाईपलाईन प्रकल्प यांनी उपोषण मागे घेण्याचं विनंती निवेदन उपोषणकर्त्याना दिलं. या विनंतीचा विचार करून उपोषण सोडण्यात आले.

धरणे आंदोलनासाठी शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती:

प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व उपोषणास समर्थन देण्यासाठी सोमवार पासून धरणे आंदोलनाची जोड देण्यात आली. या आंदोलनास जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो शेतकरी जमा झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर ठेवून धरणे आंदोलनासाठी पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने उपस्थित शेतकरी पाहता जिल्हा प्रशासनाने तातडीने मागण्या मान्य करण्याच्या हालचाली सुरु केल्या आणि अखेर उपोषण यशस्वी ठरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here