IMPACT: पालघर कृषिविभागाकडून त्या कलिंगड नुकसानीची पाहणी; घेतली नोंद!

0
532

पालघर – योगेश चांदेकर:

मुंबई ई न्यूजने ” कोरोना व्हायरसचं भूत आलं अन उभं पीक मातीमोल झालं..!” या शीर्षकाखाली शेतकऱ्याची व्यथा सांगणारी बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेत आज कृषी अधिकाऱ्यांनी पाहणी करून पीक नोंदणी करून घेतली. तसेच झालेल्या नुकसानाची माहिती घेतली.उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालूका कृषि अधिकारी तरुण वैति यांनी आपल्या टीमसह हि पाहणी केली आहे.

पालघर जिल्ह्यात अनेक शेतकरी हे तरकारी पिकांचे (नगदी पिके) उत्पादन करतात. यातल्या बहुसंख्य शेतकऱ्यांना लॉक डाऊनचा फटका बसला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून अद्याप नुकसान भरपाई पंचनामा करण्याचे आदेश मिळालेले नाहीत मात्र अशाप्रकारचा आदेश आल्यास कृषी विभाग त्वरित कार्यवाही करेल अशी माहिती यावेळी आलेल्या अधिकाऱ्यांनी दिली.

  • “भरत कोलेकर यांच्या कलिंगड शेतीबद्दल बातमी निदर्शनास आल्यानंतर आज पिकाच्या नुकसानीची पाहणी केली व त्याची नोंद करून घेतली आहे. कोरोना हे मोठं संकट आहे, शेतकरी सहाय्यता गटांनी व सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांनी थेट वितरण प्रणाली राबवण्यास मदत केल्यास काही शेतकऱ्यांचं तरी होणारे नुकसान टाळता येईल.” 
    – तरुण वैति,(तालूका कृषि अधिकारी – पालघर)
  • “वितरण व्यवस्था कोलमडल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी सहाय्यता गटांच्या मार्फत सोसायट्यांमध्ये हा कृषिमाल वितरित करण्याबाबत नियोजन सुरु आहे. काही शेतकरी गटांसोबत याबाबत अधिकारी चर्चा करत असून लवकरच वितरण सुरु करतील, यातून किमान उत्पादन खर्च तरी शेतकऱ्याला मिळेल हि अपेक्षा आहे.” 
    – दिलीप नेरकर, उपविभागीय कृषी अधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here