पालघर: कोरोनाच्या संकटात भाऊच उठतोय भावाच्या जीवावर; कासा पोलीस ठाण्यात तक्रार!

0
383

पालघर – योगेश चांदेकर:

कोरोनाच्या संकटात अनोळखी लोकं एकमेकांना मदत करत असताना पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कोल्हाण पाटीलपाडा याठिकाणी मात्र भाऊबंदकी’तुन भावानेच घराचे दरवाजे काढून नेल्याची घटना घडली आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील तवा कोल्हाण फाटा येथे राहणाऱ्या मधुकर सखाराम काकरा व १ सह आरोपी याच्याविरोधात कासा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आरोपी मधुकर सखाराम काकरा याने आपल्या मोठ्या भावाच्या कोल्हाण पाटीलपाडा येथील घराचे ४ दरवाजे काढून नेले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मी नदीवर अंघोळीला गेलो असता आरोपी आपल्या पत्नीसह घरी आला व माझ्या पत्नी आणि मुलाला दमदाटी करत घराचे ४ दरवाजे पांढऱ्या रंगाच्या पिकअप या चारचाकी वाहनातून नेले. या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी गेलो असता माझ्या संपूर्ण कुटुंबास जीवे मारण्याची धमकी दिली अशी माहिती फिर्यादीने दिली आहे. फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये शेती व घर यावरून गेल्या काही दिवसांपासून वाद-विवाद होत आहे. आरोपीने वडिलोपार्जित शेतजमीन परस्पर आपल्या नावावर केल्याने हे वाद सुरु आहेत.

कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी आदेश लागू असताना आरोपी दरवाजे काढून नेण्यासाठी चारचाकी वाहन घेऊन कसा गेला हा प्रश्न उपस्थित होतो आहे. दरम्यान कासा पोलीस ठाण्यात कलम ३७९, ४५२, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास हेड कॉन्स्टेबल चव्हाण हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here