पालघर: वनविभागातील ‘त्या’ अधिकाऱ्यांची होणार खातेअंतर्गत चौकशी

0
451

पालघर – योगेश चांदेकर:

‘आम्ही ठरवू तेच होणार’; वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार..! या मथळ्याखाली मुंबई ई न्यूजने पालघर जिल्ह्यातील वनविभागाच्या मनमानी कारभाराची पोलखोल केली होती. वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी वारंवार हम करेसो कायदा असे वागत असल्याच्या गोष्टीचा प्रत्यय येऊन देखील वरिष्ठांकडून याच्याकडे दुर्लक्ष होते. मुंबई ई न्यूजने याचा पाठपुरावा करताच ते अधिकारी प्राथमिक दृष्ट्या दोषी आढळल्याने त्यांच्यावर दोषारोप लावत त्यांची खातेनिहाय विभागीय चौकशी होणार आहे.

बोर्डी वनपरिक्षेत्र हद्दीतील तलासरी वनोपज तपासणी नाका येथे एका ट्रकला अडकवून ठेवण्यात आले होते. वाहतूक व्यवस्था बंद, हॉटेल बंद अशा परिस्थितीत अडकलेल्या ड्रॉयव्हरला मुंबई ई न्यूजकडे आपली व्यथा मांडताना अश्रू अनावर झाले होते. मालाच्या खरेदीची कागदपत्रे दाखवून अनेकवेळा गयावया करून देखील अधिकाऱ्यांना त्याची जरा सुद्धा कणव आली नाही. तर दुसऱ्या प्रकरणात डहाणू येथील सहाय्यक वनसंरक्षक राहुल मराठे यांच्या तोंडी आदेशावरून वन परिक्षेत्र अधिकारी एस एस पाटील यांनी कोणतीही कारवाई न करता स्पाईन वुडची वाहतूक करणारे वाहन गुजरातच्या दिशेने परत पाठवले होते. त्यामुळे मनमानी पद्धतीने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी व्हावी यासाठी मुंबई ई न्यूजचे पालघर विभागीय संपादक योगेश चांदेकर वारंवार पाठपुरावा करत आहेत. आता या अधिकाऱ्यांची चौकशी झाल्यानंतर त्यांच्यावर काय कारवाई होते हे लवकरच समजेल.

“बोर्डी वनपरिक्षेत्र हद्दीतील तलासरी वनोपज तपासणी नाका येथे २० दिवसांपासून ट्रक अडवून ठेवण्यात आला होता. तर चारोटी टोलनाका येथे अडविण्यात आलेला स्पाइनवुडची वाहतूक करणारा ट्रेलर गुजरातच्या दिशेने सोडण्यात आला होता. या दोन्ही प्रकरणांत अधिकारी प्राथमिक चौकशीत दोषी आढळून आल्याने दोषारोप पत्र दाखल करत त्यांची खातेअंतर्गत विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.” – नरेश झुरमुरे, मुख्यवनसंरक्षक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here