पालघर:रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकरी लुबाडणूक प्रकरणी आरोपींच्या समर्थकांकडून गुन्ह्याच्या तपासात हस्तक्षेप..!

0
354

पालघर – योगेश चांदेकर:

रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकरी लुबाडणूक प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींच्या समर्थकांकडून गुन्ह्याच्या तपासात हस्तक्षेप होत असल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे. साक्षीदारांना हेरून त्यांच्यावर दबाव आणला जात असल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे. यामुळे या प्रकरणातील फरार आरोपींचा तात्काळ शोध घेत साक्षीदारांवर दबाव आणण्यासाठी कार्यरत लोकांचा देखील बंदोबस्त पोलीसांना करावा लागणार आहे.

दरम्यान मिळालेल्या नुकसान भरपाईमधील ३५ टक्के रक्कम जबरदस्तीने वसूल केली असल्याचा धानीवरी येथील काही शेतकऱ्यांनी ६ जुलै रोजी आर्थिक गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्यांकडे जबाब नोंदवला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी त्या शेतकऱ्यांनी प्रतिज्ञापत्र करत घुमजाव केले आहेत. यातून आरोपीच्या समर्थकांनी गुन्ह्याच्या तपासाची माहिती मिळवत साक्षीदारांवर पाळत ठेवून दबाव निर्माण केला असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तपासात अशाप्रकारे अडथळा आणणाऱ्यांना पोलीस प्रशासनाने वेळीच चाप लावून आदिवासी शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करणे गरजेचे आहे. यासोबतच साक्षीदारांना फूस लावून दबाव निर्माण करत असणाऱ्या लोकांचा देखील गुन्ह्यात सहभाग आहे का हे तपासणे महत्वाचे आहे. गुन्ह्याची व्याप्ती व गरीब शेतकऱ्यांची फसवणूक पाहता फरार आरोपी निलेश गणपत पाटील, गणेश किसन आडगा, प्रकाश हरसन तांबडा, विनायक दामा कोदे, गोविंद जेठ्या हरपाले यांना तात्काळ अटक होणे गरजेचे आहे.

रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकरी लुबाडणूक प्रकरणी अटकेतील आरोपी नारायण डबके व इतर ३ च्या जामीन अर्जावर आज अमृत अधिकारी वकीलांनी लेखी युक्तिवाद दिला. या जामीन अर्जावर १८ जुलै रोजी आदेश पारीत होणार आहे. तसेच फरार आरोपी निलेश पाटील याने अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज मागे घेतल्यानंतर फरार आरोपी गणेश आडगाच्या अटकपुर्व जामीन अर्जामध्ये त्याचे वकील टावरे १८ जुलै रोजी लेखी युक्तिवाद दाखल करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here