पालघर: अत्यावश्यक सेवा पासची खैरात; व्यापारी असोसिएशन उपाध्यक्षाला चक्क लेबरचा पास..!

0
407

पालघर – योगेश चांदेकर:

तुम्ही जर एखाद्या नामांकित इंजिनिअरीगं वर्क आणि वॉटर सप्लायर्स कंपनीचे मालक असाल, तुमच्या मुलाचे स्वतःचे मेडिकल स्टोअर असेल आणि तरीही तुम्हाला अत्यावश्यक सेवा पास जर तुम्ही एक सामान्य कामगार आहेत असा मिळत असेल तर? स्वतःच्या मालकीचा बंगला, चारचाकी गाडी हे सर्व असताना तुम्हाला अत्यावश्यक सेवा कामगार म्हणून पास मिळवायचा असेल तर? वाचूनच चक्रावलात ना? अगदी असाच फिल्मीस्टाईल वाटणारा हा प्रसंग पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात घडला आहे. जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग डहाणू मधील उपअभियंत्याच्या मेहेरबानीने हा प्रकार घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सविस्तर माहिती अशी आहे की, तलासरी व्यापारी असोशिएशनचे उपाध्यक्ष महेंद्र व्ही पटेल यांना संजय संकपाळ, उप अभियंता – जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग डहाणू यांच्या सही शिक्क्याचा चक्क अत्यावश्यक सेवा लेबर असल्याचा पास दिला आहे. तलासरी येथील पटेल यांना १६ एप्रिल २०२० ते ३० मे २०२० या कालावधीकरिता हा पास देण्यात आला होता. सदर बोगस पास देणे व घेणे शासनाची फसवणूक नाही का? संबंधित अधिकाऱ्याला पास द्यायचाच होता तर त्याने तो लेबर म्हणून का दिला? असा पास बनविण्याचा हेतू काय हेतु होता? जिल्हा रेड झोनमध्ये असताना एखाद्यावर एवढी मेहरबानी का दाखवण्यात आली? संबंधित अधिकाऱ्याने जिल्ह्यात असे एकूण किती पास दिले आहेत? देण्यात आलेल्या सर्व पासेसची नोंद त्याने ठेवली आहे का? असे अनेक प्रश्न उपअभियंता संकपाळ यांनी दिलेल्या पासमुळे पुढे येत आहेत.

या प्रकरणाबाबत संकपाळ यांना विचारणा केली असता “सदर व्यक्तीस मी ओळखत नसून कामाच्या ओघात हि चूक झाल्याचे त्यांनी मान्य केलं. मान्सूनपूर्व कामे उरकण्यासाठी पास देत असताना हि चूक झाली असल्याची त्यांनी माहिती दिली. तसेच हा पास काढून घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.” मात्र प्रकरण उघडकीस आल्यानंतर कारवाई करण्यात ते कसली धन्यता मानत आहेत? या पासचा वापर करून सदर इसम कुठे कुठे फिरला असेल? आणि तो लेबर म्हणूनच का फिरत होता असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. एकंदरीत लॉक डाऊन काळात अशा किती लोकांना बोगस पास देण्यात आले आहेत? संबंधित प्रशासनाने याप्रकरणाची चौकशी करून चुकीच्या पद्धतीने पास देणाऱ्या व घेणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

“लॉक डाऊन काळात अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सामान्य माणूस बाहेर पडल्यास त्याला पोलीसांकडून काठ्या आणि धनाढ्य लोकांना बोगस पासची खैरात हे अत्यंत निंदनीय आहे. बोगस पासद्वारे तो प्रतिष्ठित व्यक्ती लेबर म्हणून का फिरत होता? हा पास दिलाच कसा? असे किती पास दिले गेले आहेत याची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी.” – विजय माळी(सामाजिक कार्यकर्ता, तलासरी)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here