डहाणू प्रतिनिधी – विनायक पवार:
डहाणू तालुक्यात बापट्स नर्सिंग होम फॉर चिल्ड्रन या खाजगी रुग्णालयाने अवाजवी बिल आकारले असल्याबाबतची बातमी मुंबई ई न्यूजने प्रसिद्ध केली. या बातमीनंतर डहाणूसह जिल्ह्यातील नेटिझन्सनी समाजमाध्यमांवर संबंधित हॉस्पिटलकडून मिळालेल्या कटू अनुभवांचे दाखले देत अक्षरशः टीकेची झोड उठवली. बापट्स नर्सिंग होम फॉर चिल्ड्रन या हॉस्पिटलने राजू विंदन यांच्याकडून तब्बल एक लाख ६६ हजार रुपये पत्नीचे डिलिव्हरीचे बिल म्हणून आकारले. यामुळे प्रशासनाने या घटनेची चौकशी करण्याची मागणी सर्वस्तरांतून होत आहे. यावर सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी मात्र मा. प्रांत अधिकारी डहाणू यांच्याकडे लेखी तक्रार आल्यासच चौकशी करू अशी प्रतिक्रिया दिली. कोरोना महामारी असताना देखील लेखी तक्रारीचा अट्टाहास नेमका कशासाठी धरला जात आहे असा प्रश्न जिल्ह्यातील जनतेस पडला आहे.
दरम्यान दुसऱ्यांदा टाळेबंदी झाल्यानंतर लोकांना घरी राहण्याचे आवाहन याचं प्रशासनाकडून केले गेले आहे. कालच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा प्रभाव जास्त असणाऱ्या जिल्ह्यामंध्ये लॉक डाऊन बाबतचे नियम जैसे थे राहतील हे जाहीर केले. याव्यतिरिक्त तालुक्यात सध्या कोरोना संसर्ग रोखण्यासाठी निर्गमित निर्बंध मोडल्याचे कुठे लग्न कार्य, तसेच मास्क न घालून फिरणाऱ्यांवर कारवाईचे धाडसत्र सुरु आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर केवळ फोन वरील तक्रारी वरून देखील कारवाई करण्यात आली आहे. हे चित्र एकीकडे असतानाच दुसरीकडे मात्र गोर गरीब जनतेला लुटण्याचे काम करणाऱ्या खाजगी रुग्णालयाचा पर्दाफाश होऊन देखील तक्रारीची अपेक्षा का? कि यातून कुणास पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत आहे का? अशा शंका यामुळे उपस्थित होत आहेत.
सर्वसामान्य माणूस मोठ्या खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरच्या विरोधात जाऊ शकत नाही. म्हणून प्रसार माध्यमातून आम्हाला न्याय मिळावा अशी अपेक्षा ठेवणाऱ्या जनतेची चूक? कि सामान्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करणारी प्रसारमाध्यम? यांपैकी नेमकी जास्तीची अपेक्षा कुणी केली. हॉस्पिटल प्रशासनाने खरोखरच योग्य बिल आकारले आहे का याची चौकशी करण्याचे आदेश देण्यासाठी देखील प्रशासनास लेखी तक्रारीची कधीपासून गरज पडू लागली आहे? अजूनही वेळ न दवडता प्रशासनाने योग्य ती चौकशी करून याप्रकरणातील सत्य सर्वांसमोर आणावे अशी माफक अपेक्षा डहाणूतील जनतेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत हे प्रकरण रंगत आणणार हेच यांतून दिसते आहे.