पालघर – योगेश चांदेकर:
शासकीय नोकरीचा राजीनामा देत शिवसेनेकडून थेट जिल्हा परिषदेच्या धाकटी डहाणू गटातून विजयी झालेले जयेंद्र दुबळा यांची मुंबई विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्यपदी निवड झाली आहे. दुबळा यांच्या निवडीने पालघर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अगदी शासकीय सेवेत असल्यापासून अनेक समाजोपयोगी उपक्रम यशस्वीपणे राबविणारे दुबळा यांनी प्रस्तावित वाढवण बंदर विरोधी समितीत उल्लेखनीय कार्य केले होते. त्याचेच फलित म्हणून त्यांना जिल्हा परिषद निवडणुकीत घसघशीत मतांनी विजय मिळवता आला.
दुबळा हे शासकीय योजना घरोघरी पोहोचावी यासाठी प्रामाणिकपणे कार्यरत होते. कंत्राटदार, भूमाफिया यांच्या विरोधातील भूमिकांमुळे शासकीय सेवेत असताना त्यांची सतत बदली केली जात होती. अनंत अडचणींना तोंड देत ते जनसेवेत मग्न राहिले, याच जनसेवेचा आणि जनसंपर्काचा त्यांना निवडणुकीनंतर देखील फायदा झाला. पालघर जिल्ह्यातील बहुसंख्य रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सोडविण्यासाठी यापुढे त्यांना कार्य करावे लागणार आहे.
प्रवाशांच्या समस्या योग्य स्तरावर मांडून त्या सोडवण्याचा प्रयत्न करण्याबरोबरच प्रवासी व रेल्वे प्रशासन यांच्यामधील दुवा होणे ही नवी जबाबादारी दुबळा यांच्यावर आली आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता सध्या सुरु असलेल्या फेऱ्यांची संख्याही कमी पडत आहे. त्याचप्रमाणे या क्षेत्रात लांबपल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य दिल्याने डहाणू लोकलला लागलेले साईडींगचे ग्रहण हा प्रश्न दुबळा सोडवतील असा विश्वास डहाणू वैतरणा प्रवासी संस्थेच्या सदस्यांनी बोलून दाखविला.