शासकीय नोकर ते जिल्हा परिषद सदस्य… शिवसेनेचा वि’जयेंद्र’!

0
441

पालघर – योगेश चांदेकर: 

भाजपचा बाल्लेकिल्ला समजल्या जाणाऱ्या धाकटी डहाणू या जिल्हापरिषद गटातून बहुमताने विजय मिळवत शिवसेना युवा नेतृत्व जिल्हापरिषद सदस्य जयेंद्र किसन दुबळा यांनी संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. वाढवण बंदरास असलेला जनमानसाचा तीव्र विरोध ओळखून शिवसेनेने बंदरविरोधात कठोर भूमिका घेतली. या प्रश्नाकडे पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांचे लक्ष वेधत त्यांच्याकडे पाठपुरावा केला. रस्त्यावरील लढाई सुरु ठेवण्यास सांगत खासदार गावित यांनी वाढवण बंदर रद्द करण्यासाठी संसदेत मुद्दा उपस्थित केला. स्थानिक प्रश्नांची जाण ठेवत, जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत जयेंद्र दुबळा यांनी अनेक प्रश्नांमध्ये जनतेला सोबत घेत कधी रस्त्यावर आंदोलनाची तर कधी प्रशासनाच्या सहकार्याची भूमिका घेत जनतेशी संपर्क जोडला आहे हेच या निवडणूक निकालातून स्पष्ट दिसत असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.

शासकीय नोकर ते जिल्हा परिषद सदस्य!

आपल्या शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन शिवसेना पक्षा कडून उमेदवारी मिळवत आज ते थेट जिल्हा परिषदेच्या धाकटी डहाणू गटातून विजयी झाले आहेत. शासकीय नोकरीत असतानाही त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम यशस्विपणे राबविले होते. शासकीय योजना घरोघरी पोहोचावी यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे कार्य सुरु ठेवले होते. कंत्राटदार, भूमाफिया यांच्या विरोधामुळे त्यांची सतत बदली केली जात होती. काही वेळा त्यांना खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न देखील झाला, अगदी जीवघेणे हल्ले सहन केले, वेळप्रसंगी जेलमध्ये सुद्धा जावे लागले मात्र लोकांसाठी काम करण्याची तळमळ कायम राखली. याच जनसेवेचा आणि जनसंपर्काचा त्यांना निवडणुकीत फायदा झाला.

पक्षाकडून जिल्हा परिषदेत महत्वाची जबाबदारी!

धाकटी डहाणू या गटात वाढवण या गावात होऊ घातलेल्या बंदरास त्यांनी मोठा विरोध दर्शविला होता. जनतेने सुद्धा जयेंद्र दुबळा यांच्या बाजूने कौल देत विजयाची माळ त्यांच्या गळ्यात घातली. जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या जयेंद्र दुबळा यांना पक्षाकडून महत्वाच्या पदावर संधी देऊन पक्ष विस्ताराचे इप्सित साध्य करण्याबरोबरच वाढवण बंदर प्रश्न भूमिपुत्रांच्या बाजूने मार्गी लावून येथील मच्छीमार, शेतकरी आणि भूमिपुत्र यांचे प्रश्न अधिक जलद गतीने सुटतील. त्यामुळे पक्ष काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले असून मतदारसंघातील जनतेच्या आशा पल्लवित झाल्याचे दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here