पालघर: केशरी रेशनकार्ड धारकांना मिळणार धान्य; १ मेपासून वाटप होणार सुरु

0
417

पालघर – योगेश चांदेकर:

जिल्ह्यातील ८ तालुक्यामधील केशरी शिधापत्रिकाधारकांनाही रेशन दुकानातून माफक दरात गहू आणि तांदूळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येत्या एक मे पासून केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वितरण करण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यातील सर्व ८ तालुक्यामध्ये सध्या अन्नसुरक्षा योजना आणि अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना धान्य वितरित करण्यात येत आहे. दरम्यान अनेक भागातून धान्य मिळत नाही अशा तक्रारी केल्या जात होत्या. त्यामुळे वितरणात फेरफार होत असल्याचा देखील संभ्रम निर्माण होत होता. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकरी संजय आहिरे यांना विचारले असता त्यांनी हि माहिती दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केशरी कार्डधारकांनाही गहू आणि तांदूळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय नुकताच घेतला. त्यामुळे आता केशरी कार्डधारकांनाही रास्त दरात गहू आणि तांदूळ देण्यात येणार असून, त्याचे वितरण येत्या एक मेपासून करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकरी संजय आहिरे यांनी दिली आहे. केशरी कार्डधारकांना गहू प्रतिव्यक्ती तीन किलो तर, तांदूळ प्रति व्यक्ती दोन किलो मिळणार आहे. केशरी कार्डधारकांसाठी गहू आठ रुपये प्रति किलो दराने आणि तांदूळ प्रति किलो 12 रुपये दराने मिळणार आहे.

  • “केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्य देण्याच्या शासन निर्णयाचा लाभ जिल्ह्यातील ११,५३,४८२ सदस्यांना (केशरी कार्डधारक) मिळणार असून पालघर जिल्ह्यात २२२४० क्विंटल तांदूळ व ३३३७० क्विंटल गहू प्रतिमाह याप्रमाणे वितरित करण्यात येणार आहे. १ मेपासून या धान्याचे वितरण सुरु होईल” – संजय आहिरे, जिल्हा पुरवठा अधिकारी

  • “वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागात – ४४००० पेक्षा जास्त व शहरी भागात – ५९००० पेक्षा जास्त आणि एक लाखापेक्षा कमी आहे अशा धान्य न मिळालेल्या केशरी शिधापत्रिका धारकांना १ मे पासून धान्याचे वितरण होणार आहे. मे व जून असे दोन महिन्यांसाठी केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप करण्यात येणार आहे.” – विनोद वागदे, पुरवठा निरीक्षण अधिकारी डहाणू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here