Mumbai e News Network:

वर्गीस कुरियन हे नाव धवल यशाशी जोडलं गेलंय.. गुजरातच्या दुध गंगेचा आनंद म्हणजे वर्गीस कुरियन.. या एका व्यक्तीच्या संकल्पनेतून धवलक्रांती घडली. त्यामुळं केवळ गुजरातच्याच नव्हे तर अवघ्या देशाच्या धवल क्रांतीला आकार प्राप्त झाला. त्याचा सकारात्मक परिणाम शेजारच्या महाराष्ट्रात झाला नसता तरच नवल.. याच क्रांतीचा महाराष्ट्रातल्या विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूरमध्ये गोकुळची वृद्धी करणारा वर्गीस कुरियन म्हणून अरूण नरके यांच्याकडे पाहिलं जातं. गोकुळच्या अध्यक्षपदी दहा वर्षे राहून त्यांनी केलेल्या कार्याची आणि राबवलेल्या योजनांची आजही दूध उत्पादक शेतक-यांना मदत होतेय. गेल्या चाळीस वर्षात या माणसानं केलेल्या अफाट कार्यासाठी म्हणूनच त्यांना वर्गीस कुरियन यांच्या नावे पुरस्कारही मिळाला आणि ते महाराष्ट्रासाठी कुरियनच ठरले.
स्वर्गीय आनंदराब पाटील चुयेकर साहेबांनी सुरवातीच्या काळात केलेले मार्गदर्शन आणि दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत कोल्हापूर जिल्हा दुध संघ अर्थात ‘गोकुळ’ची कीर्ती नरकेंनी देशभर पसरवली. वर्गीस कुरीअन यांच्या विचारांचे खरेखुरे वारसदार बनले. वाडी-बस्ती वरील गोठ्यापासून ऑपरेशन फ्लडच्या निमित्ताने १९७८ साली सुरु झालेला हा प्रवास आजही अव्याहतपणे सुरु आहे. गेल्या पाच दशकातील अविरत तपश्चर्या आहे. गोकुळचे संचालक आणि अध्यक्ष म्हणून काम करत असताना आपल्या कारकिर्दीत त्यांनी डेअरी उद्योगात नवे मानदंड निर्माण केले. गोकुळ दुध संघात नवनवे तंत्रज्ञान आणण्यासोबत, दृग्ध शाळेचे विस्तारीकरण, आय.एस.ओ. मानांकन, विक्री मुल्यातील बाटा उत्पादकांना मिळण्यासाठी दर फरक रकमेचे उत्पादकांना वाटप, दुध सोसायट्यांचे सक्षमीकरण, दूध उत्पादन वाढीसाठी पशुसंवर्धन, कृत्रीम रेतन, वंध्यत्व निवारण, पशुखाद्य, गोकुळ ग्राम विकास योजना, महिला नेतृत्व विकास योजना, कर्मचाऱ्यांना कौशल्य विकसित करणारे प्रशिक्षण, दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रशिक्षण, दूध उत्पादक आणि ग्राहकांना प्रकल्प भेटी, अधिक दर मिळावा यासाठी दुधाच्या उप पदार्थांची निर्मिती, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीसाठी मोठ्या शहरातील बाजारपेठेपर्यंत विस्तार असे अनेक पथदर्शी प्रकल्प त्यांनी केवळ राबवलेच नाहीत तर ते तडीस नेले. त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली वासरू संगोपन योजना केवळ यशस्वीच झाली नाही तर भारताच्या पशुसंवर्धन क्षेत्रात नवा मानदंड निर्माण करणारी ठरली. दर महिन्याच्या ३, १३ आणि २३ तारखेला दुधाची बिले देण्याच्या प्रघात निर्माण करण्यासोबत दूध बिले दूध उत्पादनात खऱ्या अर्थाने योगदान देणाऱ्या महिलांच्या हातात देऊन त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून दिले आणि या व्यवसायाला शाश्वत आणि उत्पादक शेतकऱ्याला आत्मनिर्भर बनवले यातूनच ग्रामीण अर्थव्यवस्थेला नबी उभारी मिळाली.

गोकुळला मिळालेल्या १४ राष्ट्रीय पुरस्कारांपैकी १० राष्ट्रीय पुरस्कार नरके यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत मिळाले. डेअरी उद्योगाचे भारताचे प्रतिनिधित्व केले. आपल्या अतुलनीय योगदानातून कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील घराघरात खऱ्या अर्थाने गोकुळ निर्माण केलं. आज महाराष्ट्रातील डेअरी उद्योगाच्या इतिहासात अरुण नरके यांचं नाव आदरानं घेतलं जातं ते याचंमुळं. म्हणूनच नरके यांना महाराष्ट्राचे वर्गीस कुरियन म्हटलं तर वावगं ठरू नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here