पालघर – योगेश चांदेकर:
पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे दोन साधू व त्यांच्या वाहनचालकांची जमावाने अमानुषपणे हत्या केली होती. याप्रकरणात कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव काळे व पोलीस उपनिरीक्षक सुधीर काटारे यांच्यावर कामात कचुराई केल्याचा ठपका ठेवून निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे ‘लेडी सिंघम’ सहायक पोलीस निरीक्षक सिध्दवा जायभाये यांच्याकडे कासा पोलीस ठाण्याच्या ठाणेप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
पालघर पोलीस दलात त्या सहायक पोलीस निरीक्षक असून त्यांच्याकडे एका 200 कोटीच्या घोटाळ्याचा तपास होता. त्या प्रकरणातून त्यांच्यावर दीड महिन्यापूर्वी गोळीबार देखील झाला होता त्यामुळे ‘लेडी सिंघम’ सिध्दवा जायभाये हे नाव संपूर्ण राज्याला परिचयाचे झाले होते. कर्तव्यकठोर महिला अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. यामुळेच त्यांच्यावर विश्वास ठेऊन त्यांना कासा पोलीस ठाण्याच्या ठाणेप्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे. खाकी वर्दीत त्या एखाद्या गुन्हेगारासमोर पोहचतात तेव्हा त्याला घाम फुटल्याशिवाय राहत नाही. खून, महिला अत्याचार, तस्करी, दरोडे यासारख्या गंभीर गुन्ह्याचा शोध लावण्यात महत्वाची भूमिका पार पाडली आहे.
सिद्धवा जायभाये ह्या मुळच्या बीड जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील आहेत. अगदी लहान वयापासूनच त्यांना पोलीस सेवेविषयी कुतूहल होत. मोठे झाल्यावर आपणही पोलीस दलात सेवा करायची हे त्यांचं स्वप्न होत. महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध त्या महाविद्यालयीन जीवनात पेटून उठायच्या. अशातच २००९ मध्ये त्यांनी एम पी एस सी परीक्षेत यश मिळवले आणि त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली. सुरुवातीला त्यांची नेमणूक पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनला झाली आणि अगदी अल्पावधीतच त्यांना बढती मिळाली आणि त्यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती झाली. २०१० ते २०१३ – फरासखाना पोलीस स्टेशन, २०१३-२०१७ – गुन्हे अन्वेषण विभाग पुणे, २०१७ ते २०१८ – केळवा पोलीस स्टेशन प्रभारी, २०१८ ते २०१९ – मनोर पोलीस स्टेशन प्रभारी, २०१९ ते २०२० – प्रभारी स्थानिक गुन्हे शाखा वसई असा त्यांचा प्रवास राहिला आहे.

मीरा-भायंदर, वसई- विरार महापालिका आणि २७ गावासाठी एमएमआरडीए मार्फत ४०३ एम. एल. डी क्षमतेची पाणीपुरवठा योजना राबविली जात असताना आदिवासी शेतकरी व ग्रामस्थांनी याला तीव्र विरोध केला होता. त्यावेळी सिद्धवा यांनी मध्यस्थी करीत एमएमआरडीएला काम बंद करण्यास सांगितले तसेच शेतकऱ्यांची व जिल्हाधिकाऱ्यांची भेट घडवून दिली होती. केळवा येथे कार्यरत असताना बुलेट ट्रेन प्रकल्प जमीन मोजणीसाठी सिध्दवा यांनी दिलेल्या संरक्षणाबद्दल व संपूर्ण कामात केलेल्या सहकार्याचे तहसीलदार पालघर यांनी कौतुक केले होते. गुन्हेगारांवर जरब, जमावावर नियंत्रण ठेवण्याचे त्यांचे कौशल्य, गुन्हे अन्वेषणचा अनुभव या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. यांचाच विचार करता त्यांना कासा पोलीस ठाण्याचा चार्ज देण्यात आला असावा हे नक्की…
सिध्दवा जायभाये यांना गुन्हे आणि गुन्हेगारांबाबत प्रचंड चीड आहे. त्यात महिला आणि लहान मुलांवर होणारे अत्याचार सहनच होत नाही. कुठेही अशी घटना घडली की त्या जाऊन धडकतात. यासोबतच त्या सायबर सेल, मानवाधिकार, महिला व सामाजिक संघटनांच्या कार्यात नेहमी मार्गदर्शन करतात. रोटरीने त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल सिध्दवा यांचा “आधुनिक युगातील माँ दुर्गा” असा गौरव केला आहे. महिला व मुलींनी आत्मनिर्भर व्हावे, आलेल्या प्रत्येक संकटाला तोंड द्यावे आणि अन्यायाविरुद्ध दाद मागावी असे सिध्दवा जायभाये यांचे परखड मत असते.