पालघर-योगेश चांदेकर :

पालघर- महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागा मार्फत जिल्ह्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन कृषि व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

एकविरा महिला बचतगट पंचायत समिती कार्यालय पालघर येथे शिवभोजन योजनेचा शूभारंभ पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वणगा, पालघर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा डॉ. उज्वला काळे, पालघर पंचायत समितीच्या सभापती मनिषा पिंपळे, जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन, उप जिल्हाधिकारी (सामान्य) डॉ. किरण माहजन, निवासी उप जिल्हाधिकारी संजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या शिवभोजन योजनेअंतर्गत राज्यात स्वस्त दरात शासकीय अनुदान प्राप्त भोजनालयातून भोजन उपलब्ध करून देण्याची योजना आहे. या योजनेअंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या भोजनालयात दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक वाटी वरण, भात समाविष्ट असलेली जेवणाची थाळी दहा रुपये प्रति थाळी याप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येईल. भोजनालय चालवण्यासाठी सद्यस्थितीत सुरु असणाऱ्या खानावळ, एनजीओ, महिला बचत गट, भोजनालय, रेस्टोरेंट अथवा मेस यापैकी सदर योजना राबविण्यास सक्षम असलेल्या भोजनालयाची निवड करण्यात आली आहे. पालघरमध्ये एकवीरा महिला बचतगट, पंचायत समिती कार्यालय येथे शिवभोजनाचा प्रारंभ झाला असून गरीब, गरजू जनतेला सवलतीच्या दरात फक्त 10 रुपयात भोजन उपलब्ध करुन देण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here