“मोदीजी, बताइयें जीना है, या मरना है?” पालघरमधील युवकाचा पंतप्रधानांना सवाल..!

0
427

पालघर – योगेश चांदेकर:

कोरोनामुळे ठप्प झालेला व्यापार-उद्योग पाहता केंद्र सरकारने रिझर्व्ह बॅंकेच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरूपात सर्व वित्तीय संस्थांच्या सर्व प्रकारच्या वसुलीला स्थगिती देण्याची सूचना केली होती. सर्व प्रकारचे कर्जाचे हप्ते, कॅश क्रेडिटचे व्याज, क्रेडिट कार्डांची बिले आदींच्या भरण्यासाठी तीन महिने स्थगिती देण्याची सूचना केली होती. मात्र अनेक खासगी बँका व वित्तीय संस्थांनी हप्ते वसुली सुरूच ठेवली आहे. त्यामुळे पालघरममधील युवकाने थेट प्रधानमंत्री कार्यालयाला ट्वीट करत “मोदीजी, बताइयें जीना है या मरना है” असा संतप्त सवाल केला आहे.

संपूर्ण देशात लॉक डाऊन असल्याने सर्वजण घरातच अडकून पडले आहेत. अशा परिस्थितीत खासगी बँकांकडून व फायनान्स कंपन्यांकडून वसुली सुरु आहे. “फायनान्स कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांकडून वसुलीसाठी रोज तगादा लावला जात आहे. ३० ते ४०% दंड आकाराला जाण्याची भीती दाखवली जात आहे. इंडिया बुल्स या कंपनीकडून व TDC बँकेकडून कर्ज हप्त्यांची वसुली सुरुच आहे त्यामुळे खाण्याचे वांदे असताना पैसे कुठून आणायचे.” असा प्रश्न पालघरमधील अनिल खजूरे याने PMOINDIA ला ट्वीट करत विचारला आहे. या कंपन्यांना वेळीच आवरले नाही तर संपूर्ण परिवारासह आत्महत्या करावी लागेल. त्यामुळे लवकरात लवकर यामध्ये लक्ष घालून RBI च्या सूचनेस केराची टोपली दाखवणाऱ्या वित्तीय कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी त्याने केली आहे.

आज शेतकरी, लहान-मोठे व्यापारी, उद्योजक, नोकरदार, कंत्राटी कर्मचारी, कामगार असे समाजातील सर्व घटक घरात अडकून पडले आहेत. बहुतांश लोकांकडे जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी पैसे नाहीत. उद्योग- व्यवसाय सारे ठप्प असल्याने पैशांची देवाणघेवाण थांबली आहे. अशा परिस्थितीत कर्जाचे हप्ते, इन्स्टॉलमेंट भरायला लोकांनी पैसे आणायचे कुठून हा प्रश्न आहे. त्यातच हप्ता चुकला तरी त्याचा ‘सिबिल’वर प्रतिकूल परिणाम होतो. खजुरे या तरुणाप्रमाणेच देशातील अनेकांना सध्या या अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे RBI व सरकारच्या सूचनेस केराची टोपली दाखवणाऱ्या वित्तीय कंपन्यांवर केंद्र सरकार काय कारवाई करणार हे येणारा काळच सांगेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here