लॉकडाऊनमध्ये शारीरिक समस्या उद्भवू शकतात… अशी घ्या आरोग्याची काळजी!

0
415

मुंबई – संकलन( योगेश चांदेकर):

सध्या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे अनेकजण वर्क फ्रॉम होम अर्थात घरातूनच काम करत आहेत. मुंबई ई न्यूजच्या वाचकांना आरोग्याची काळजी घेता यावी यासाठी मार्गदर्शनपर तज्ञ डॉक्टरांचे लेख आम्ही प्रसिद्ध करत आहोत. डॉ. अश्विन बोरकर, सल्लागार न्यूरोसर्जन तज्ज्ञ (मेंदू आणि मणक्यांची शस्त्रक्रिया) वोक्हार्ट रूग्णालय, मीरारोड यांनी लॉकडाऊनमध्ये कोणत्या शारीरिक समस्या उद्भवू शकतात व त्यासाठी काय बचावात्मक गोष्टी कराव्या लागतील याच केलेलं सखोल मार्गदर्शन:

कोरोना व्हायरसपासून जास्तीत जास्त लोकांचा बचाव करता यावा, यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. परंतु, लॉकडाऊनमुळे सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. संपूर्ण दिवस घरीच रहावे लागत असल्याने लोकांच्या शारीरिक हालचाली मंदावल्या आहेत. याचाच परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होऊ शकतो, असे डॉक्टर सांगतात.

सध्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातलायं. या आजारांच्या रूग्णसंख्येत प्रकर्षाने वाढ होतेय. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात संचारबंदी लागू केली आहे. यामुळे नागरिकांचे घराबाहेर पडणं आता बंद झाले आहे. जीव वाचवण्यासाठी घरीच रहावे लागत असल्याने अनेक नोकरदार मंडळी आता ‘वर्क फ्रॉम होम’ करताना दिसून येत आहेत. सांगायचे तात्पर्य म्हणजे, बैठ्या जीवनशैलीमुळे शारीरिक हालचाल कमी झाली आहे. त्यातच आता लॉकडाऊनमुळे घरीच बसून काम करावे लागत असल्याने दिवसभर एकाच जागी बसून राहिल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

बसण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे समस्या उद्भवतात

लॉकडाऊनमुळे प्रत्येक जण घरी बसून काम करण्याच्या विविध पद्धतीचा अवलंब करताना दिसत आहेत. ऑफिसला न जाता, क्लायंट मीटिंग न करता, फिल्डवर न जाता सुद्धा अनेकांना थकवा जाणवतोय? म्हणजेच लोक एकीकडे ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यास यशस्वी होत असताना दुसरीकडे मात्र शारीरिक तंदुरूस्ती राखण्यात अपयशी ठरतायेत. कारण, घरी ऑफिसचे काम करताना अनेक लोक बेड, पलंग किंवा खुर्च्यांवर बसतात हे अतिशय चुकीचं आहे. अशा स्थितीत अधिक काळ बसल्याने खांदा आणि मानेवर दबाव येऊ शारीरिक समस्या उद्भवू शकते.

‘वर्क फ्रॉम होम’ सुरू असल्याने दिवसभर एकाच जागी बसावे लागते. त्यामुळे हालचालच होत नाही आणि अपचनाचा त्रास होतो. रात्री उशिरा झोपणे आणि सकाळी उशिरा उठणे, असे चक्र सुरू झाल्याने खाण्यापिण्याच्या वेळा बदलल्या आहेत. त्यामुळे अनेकांना डोकेदुखीची समस्याही जाणवू शकते.

असे करणे टाळावे-

  • पाठीला ताण देऊ नकाः- कोणतीही वस्तू उचलण्यासाठी किंवा झाडण्यासाठी पाठीवर ताण देऊ नका. यामुळे पाठदुखी होऊ शकते.
  • बराच वेळ एकाच ठिकाणी बसणे टाळाः- शारीरिकदृष्ट्या फिट रहायचे असल्यास सतत हालचाल करणे गरजेचं आहे. त्यामुळे घरातून ऑफिसच काम करताना अधिक वेळ एकाच ठिकाणी बसून राहू नका. स्वयंपाक घरात काम करत असतानाही वारंवार चालण्याची सवय करावी. यासाठी फोनवर बोलतानाही बसून न बोलता फिरून बोलण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून शारीरिक हालचाल होऊ शकेल.
  • संगणकावर काम करताना खाली वाकणेः- संगणकावर काम करताना खाली झुकणे हानिकारण ठरू शकते. यामुळे मान, मानेच्या मागच्या बाजूला आणि खांद्याला वेदना होऊ शकते. याकरता संगणकाची स्क्रीन चेहऱ्याच्या समोर दिसेल यासाठी त्याखाली पुस्तके लावून ती वर करा. त्यामुळे आपण संगणकाची स्क्रीन योग्यरित्या पाहू शकाल. जेणेकरून काम करताना खाली वाकल्याने मान व मणक्याला त्रास जाणवणार नाही.
  • पलंगावर बसू नयेः- काम करत असताना पलंगावर बसून काम करणे शक्यतो टाळावेत. यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
  • जास्त वेळ कोपर आणि मनगट वाकणेः- आपल्याला माहित आहे काय? टाइप करताना कि-बोर्डवर दोन्ही बाजूंना मनगट किंवा कोपर वाकवून ठेवल्यास सांधे आणि त्यांच्या मज्जातंतूंना त्रास होऊ शकतो. यावर वेळीच उपचार न झाल्यास त्रास वाढल्यास Carpal Tunnel Syndrome हा आजार होऊ शकतो. यात हाताला मुंग्या येणं ही समस्या उद्भवते. त्यामुळे काम करत असताना संगणकाच्या मोठ्या स्क्रीनसह मोठा कि-बोर्ड असणे आवश्यक आहे.

काय करावे-

  • नियमित शारीरिक व्यायाम करणे गरजेचं आहे. पोट, पाठ आणि पायाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी व्यायाम हा उत्तम पर्याय आहे. याशिवाय मन व शरीरावरील ताणतणाव कमी करायचा असल्यास योग अतिशय फायदेशीर आहे.
  • घरातून काम करताना अधून-मधून थोडी विश्रांती घेण्याचा प्रयत्न करा आणि कही काळ उभे रहा.
  • खांद्याला आणि मानेला आराम मिळेल, अशा व्यायाम प्रकाराचा नेहमी सराव करा.
  • योग्य श्वासोच्छवासाच्या तंत्राचा सराव करा.
  • घरी बसून काम करताना कंबर दुखत असल्यास उशीचा वापर करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here