देशभरात ३ मे पर्यंत लॉकडाऊन : पंतप्रधानांची घोषणा

0
360

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर भारतात पुन्हा लॉकडाऊन वाढविण्यात येत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. संपूर्ण देशात हा लॉकडाऊन ३ मे वाढविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजीच्या मध्यरात्रीपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्याची घोषणा केली होती. हा लॉकडाऊन २१ दिवसांसाठी असेल असे जाहीर केले होते. आज (मंगळवार) ही मुदत संपली. त्यानंतर आज सकाळी दहा वा. पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा देशाला संबोधित करताना ही घोषणा केली.

पंतप्रधान मोदी यांनी प्रथम घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. यानंतर त्यांनी सर्व देशवासीयांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात एकजुटीने साथ दिल्याबद्दल आभार मानले. ते म्हणाले की, ज्यावेळी भारतात एकही कोरोनाचा रुग्ण नव्हता, त्यावेळीच आवश्यक उपाययोजना सुरु केल्या होत्या. लॉकडाऊनचा निर्णय वेळीच घेतला नसता तर भारताला इतर प्रगत देशांप्रमाणे भयंकर अवस्थेला तोंड द्यावे लागले असते. जरी आर्थिक दुरवस्थेला तोंड द्यावे लागत असले तरी माझ्या असंख्य भारतवासीयांच्या प्राणाच्या समोर त्याचे मोल काहीच नाही. आता ज्याप्रमाणे खबरदारी घेत आहोत, तीच पुढील काळात घ्यावयाची आहे. कोरोनाचा फैलाव अत्यंत मर्यादित असेल त्याच भागात २० एप्रिलनंतर मर्यादित स्वरुपात काही बंधने शिथिल करण्यात येतील. २० एप्रिलपर्यंत सर्व देशवासीयांनी कठोर निकषांचे पालन करावयाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here