पालघर प्रतिनिधी:

रिलायन्स गॅस पाईपलाईन प्रकल्पपिडीत शेतकऱ्यांचा पालघर ते मंत्रालय असा मूक मोर्चा १८ नोव्हेंबर रोजी योजला होता. जिल्ह्यातील हजारो शेतकरी या मूक मोर्चासाठी एक दिवस अगोदरपासूनच जमा झाले होते. मुंबईच्या दिशेने निघालेल्या या शेतकऱ्यांना अडवण्यासाठी पोलिसांनी मध्यरात्री पासूनच सुरुवात केली. निषधाचे काळे झेंडे घेऊन आपल्या हक्कासाठी मूक मोर्चासाठी निघाले होते. पोलीस बळाचा वापर करून मोर्चा निघूच नये यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या पोलीस प्रशासनाच्या दडपशाहीला झुगारून रिलायन्स पिडीत शेतकरी आपल्या न्याय मागण्यासाठी गनिमी काव्याचा वापर करून तवा येथुन निघाले. मार्गस्थ शेतकऱ्यांना दोन किलोमीटर अंतरावरील चिंचपाडा येथे पुन्हा अडवण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय वझे यांच्यासह इतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिसांनी चिंचपाडा येथे अडवल्यानंतर मोर्चाच्या भूमिकेबाबत आक्रमक शेतकरी आमरण धरणे आंदोलनासाठी बसले. अशावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ पालघर येथील जिल्हाधिकारी कार्यालय व ऍडिशनल अधिक्षक गायकवाड यांच्याकडे चर्चेसाठी गेले. शिष्टमंडळा बरोबरच्या चर्चेत एकूण महत्वाच्या चार मागण्या मान्य करण्यात आल्याची माहिती शिष्टमंडळातील सदस्यांनी दिली. मात्र “या चार मागण्यांव्यतिरिक्त इतर काही महत्वाच्या मागण्या आहेत त्या जिल्हाधिकारी मान्य करीत नाहीत व यामध्ये रिलायन्स कंपनीचा वरदहस्त आहे” असा आरोप यावेळी शिष्टमंडळातील शेतकऱ्यांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालय पालघर व पोलीस अधीक्षक कार्यालय पालघर यांनी पुढील पंधरा दिवसात उर्वरित मागण्या मान्य न केल्यास पुन्हा आमरण उपोषण व साखळी उपोषणाचे हत्यार उपसले जाईल अशी माहिती यावेळी शिष्टमंडळातील शेतकऱ्यांनी दिली. तसेच यासंदर्भातील लेखी निवेदन मुख्यमंत्री कार्यालयासह इतर संबंधित विभागाच्या कार्यालयांना देण्यात येणार आहे.

मुंबई ई न्यूजचे विभागीय संपादक चांदेकर मध्यरात्रीपासूनच स्थानबद्ध

रिलायन्स गॅस पाईपलाईन प्रकल्पपिडीत शेतकऱ्यांच्या अन्यायाला सर्वप्रथम वाचा फोडण्याचे काम मुंबई ई न्यूजच्या माध्यमातून पालघर विभागीय संपादक चांदेकर यांनी केले. सुरुवातीपासूनच चांदेकर याप्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन आरोपींवर गुन्हे दाखल व्हावेत यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होते. यशस्वी आमरण उपोषणानंतर लाँग मार्चचे नियोजन करण्यामध्ये देखील त्यांचा महत्वाचा सहभाग आहे. अशावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच आंदोलनावर अंकुश ठेवण्यासाठी मध्यरात्रीपासूनच चांदेकर यांना त्यांच्या राहत्या घरी स्थानबद्ध करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here