मुंबई। राज्यात कोरोना विषाणूचा चौथा बळी गेला आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात एका ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा कोरोनामुळे सोमवारी सायंकाळी मृत्यू झालाय. मृत व्यक्ती काही दिवसांपूर्वीच अहमदाबादहून परत आला होता. या व्यक्तीने परदेश प्रवास केला होता असेही सांगण्यात येते.
कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आल्याने या व्यक्तीला २३ मार्च रोजी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोना विषाणू चाचणीत या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. उपचार सुरु असतानाच त्याचा सोमवारी सायंकाळी मृत्यू झाला. या व्यक्तीला मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच श्वसनास त्रास होत होता, असे सांगण्यात येते. राज्यातील कोरोनाविषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू होणारा चौथा बळी ठरला आहे.
दरम्यान, राज्यात मंगळवारी कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. राज्यात कोरोना पॉझिटिव्ह असलेले आणखी ४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यातील ३ तर साताऱ्यात १ नवा रुग्ण आढळून आला आहे. या रुग्णांमुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या आकड्याने शतक पूर्ण केले आहे. या नव्या रुग्णांसह महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १०१ वर गेला आहे. कोरोनाग्रस्तांचा वाढत असलेला आकडा पाहता महाराष्ट्रासमोरील चिंतेत भर पडत असल्याचे दिसत आहे.